साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
वावडे येथील जि.प.केंद्र शाळेत सुनिता रत्नाकर पाटील यांच्या संकल्पनेतून राखी निर्मिती उपक्रम (टाकाऊतून टिकाऊ) घेण्यात आला. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी जुन्या लग्नपत्रिका, पुठ्ठे, थर्माकोल, मणी, जुन्या साडी किंवा ड्रेसमधील टिकल्या डायमंड, कापूस अशा साहित्याचा वापर करून सुंदर अशा राख्या तयार केल्या. यानंतर सर्व विद्यार्थीनींनी विद्यार्थ्यांना राखी ओवाळून राखी बांधली. तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी वृक्षास राखी बांधून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार सर्व विद्यार्थ्यांनी केला.
स्वनिर्मित राखी बांधण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर भरभरून दिसत होता. आपणही लहान व्हावे अन् त्या सोबतच मौज करावी, असे म्हणून सर्व शिक्षिकाही त्यात सहभागी झाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमासाठी मुख्याध्यापक मगन चौधरी, उपशिक्षिका सुनिता पाटील, संगिता सोनार, अनिता बिऱ्हाडे, कविता खैरनार, पाकीजा पिंजारी यांनी परिश्रम घेतले.