साईमत नरडाणा : प्रतिनिधी
‘एमआयडीसी’त उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केमिकल कंपनीला 115 एकर जागा दिल्याच्या निषेधार्थ नरडाणा एमआयडीसी संघर्ष समितीतर्फे बुधवारी (ता. 30) मोर्चातून उद्योगमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निर्णयाचा निषेध करण्यात आला.उद्योगमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली.
नरडाणा ‘एमआयडीसी’साठी शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. तेथे औद्योगिक विकासासह स्थानिकांना रोजगार मिळावा, असा उद्देश आहे.परंतु, आधीच काही कंपन्यांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी लालसर झाले. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. ‘एमआयडीसी’तील सांडपाणी तापी नदीत जाते. या नदीतून शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांना पिण्याचे पाणी आणि शेती सिंचनासाठी पुरवठा केला जातो. केमिकल कंपनीमुळे तापी नदीचे पाणी दूषित होणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी नरडाण्यात केमिकल उद्योगांना जागा देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.
तरीही उद्योगमंत्री सामंत यांनी केमिकल कंपनीला 115 एकर जागा दिली. त्यास विरोध असून, हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मोर्चेकरी प्रा. डॉ. रमेश खैरनार, संजीवनी शिसोदे, महावीरसिंह रावल, वंदना ईशी, देवीदास बोरसे, नथा वारुडे, किशोर रंगराव पाटील, डॉ. नितीन चौधरी, विकास पाटील, रवींद्र गिरासे, प्रवीण मोरे, संदीप कोळी, मनोज रोकडे, महेंद्र खैरनार, ईश्वरलाल परदेशी आदींनी निव्ोदनाद्वारे दिला.