साईमत / बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील दगडवाडी येथे मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. कारभारी नागरे यांच्या घराला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा घरात कोणीही उपस्थित नव्हते. मात्र शेजारील व्यक्ती बाहेर गेली असता त्यांना घरातून धूर आणि ज्वाळा दिसून आल्या. त्यांनी तातडीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना सावध केले. त्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले आणि मदतीसाठी धावले.
स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला असता परिस्थिती अचानक गंभीर बनली. आगीच्या तीव्रतेमुळे घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरावरील टिनपत्रे व मोठे दगड दूरवर फेकले गेले आणि मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आग विझवण्याच्या प्रयत्नात अनेक नागरिक जखमी झाले. घाईगडबडीत काहीजण एकमेकांवर पडले, तर काहींना रस्त्यावर पडून दुखापत झाली. या दुर्घटनेत एकूण ७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा शेजारील घरांनाही धोका निर्माण झाला असता. या आगीत घरातील धान्य, महत्त्वाचे साहित्य तसेच छपरावरील स्प्रिंकलर पाइपिंग पूर्णपणे जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
