साईमत, लखनऊ ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अर्थात इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, तृणमूलसह अनेक मोठ्या व प्रमुख विरोधी पक्षांचाही समाव्ोश आहे. उत्तर प्रदेशमधील राजकीय सत्तासमीकरणे लोकसभा निवडणुकांसाठी महत्त्वाची ठरतात. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून विरोधकांच्या आघाडीला किती पाठिंबा मिळतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील एक महत्त्वाचा विरोधी पक्ष असणाऱ्या बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेशमधील दुसरा प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या सपाने इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय याआधीच जाहीर केला आहे. काँग्रेसही या आघाडीत असताना फक्त बसपाकडून स्पष्ट भूमिका जाहीर होणे शिल्लक होते. आता मायावतींनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून पुढील राजकीय वाटचाल कशा प्रकारे होईल,याबाबत स्पष्ट धोरण ट्वीटमधून मांडले आहे.
दरम्यान, एकीकडे मायावतींनी इंडियामध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला असताना त्या भाजपाला मदत करत असल्याची टीका केली जात होती मात्र, आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे मायावतींनी स्पष्ट केले आहे. “विरोधकांच्या जुगाडापेक्षा समाजातल्या कोट्यवधी उपेक्षितांमध्ये बंधुभावाच्या आधारे जोडून त्यांच्या आघाडीसह २००७ प्रमाणेच आगामी लोकसभा व चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका एकट्याने लढेल”, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. बसपाशी आघाडी करण्यासाठी सगळेच इच्छुक झाले आहेत. पण असे न केल्यास भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप होतो. त्यांच्याशी हातमिळवणी केली तर धर्मनिरपेक्ष आणि नाही केली तर मात्र भाजपासमर्थक. हे पूर्णपणे चुकीचे आहे”, असेही मायावतींनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, मायावतींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये विरोधकांच्या आघाडीला इंडिया आघाडीला भाजपाबरोबरच बसपाचेही आव्हान असेल असे चित्र आता निर्माण झाले आहे.