१० हजारांच्या मागणीप्रकरणी गुन्हा दाखल”
साईमत जळगाव प्रतिनिधी:
लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागातील कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वन विभागातील भ्रष्टाचाराच्या प्रकारांवर मोठा आघात बसला आहे.
भैय्यासाहेब भीमराव गायकवाड (वय ४३), व्यवसाय – वनरक्षक (आगार रक्षक चालक), नेमणूक – वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, यावल (जि. जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे यावल परिसरातील रहिवासी असून ते दोन बोलेरो पिकअप वाहनांच्या माध्यमातून अंजळे, पाडळसे व परिसरात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. या वाहतुकीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपी गायकवाड यांनी तक्रारदारांकडे १०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तक्रारदारांनी २० मार्च २०२६ रोजी एसीबी, जळगाव येथे तक्रार नोंदवली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने त्याच दिवशी सापळा रचला. पडताळणीदरम्यान आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तडजोडीअंती ९,००० रुपये स्वीकारण्याची तयारी आरोपीने दर्शविली. मात्र, प्रत्यक्ष पैसे घेण्यासाठी आले असता संशय आल्याने आरोपीने लाच स्वीकारली नाही. तरीही लाच मागणीचा ठोस पुरावा मिळाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत ९,०४० रुपये रोख रक्कम तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. यामध्ये सुमारे २५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि १ हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा मोबाईल यांचा समावेश आहे. या मोबाईलची पुढील तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात बाळू मराठे, राकेश दुसाने, सुरेश पाटील आदींचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.
या कारवाईमुळे वन विभागातील लाचखोरीच्या प्रकारांवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला अधिक बळ मिळणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
