साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे जागतिक पातळीवर वैश्विक सद्भावनेचे प्रयत्न होत आहेत. स्थानिक अमळनेर सेवाकेंद्रामार्फत होत असलेल्या नियोजित ब्रह्माकुमारीज् शांती सरोवर राजयोग अभ्यासकेंद्रामुळे परिसरात वैश्विक शांतीचे वातावरण तयार होईल, असा संदेश माऊंट आबूतील राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोषदीदीजी यांनी दिला. ब्रह्माकुमारीज्तर्फे गलवाडे रोड स्थित नवीन राजयोग सेवास्थानाचे भूमिपूजन केले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
समाज परिवर्तन करत असतांना अवगुणमुक्त, व्यसनमुक्त आणि विकार मुक्त समाज व्हावा, यासाठी परिसरात अमळनेर सेवाकेंद्रामार्फत होत असलेल्या विशेष प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. परिसरात असलेल्या शांतीपूर्ण आणि नैसर्गिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या वातावरणात राजयोग अभ्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारकरित्या साधकांना करता येईल, असेही त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात ब्रह्माकुमारी विद्या बहन यांनी स्पष्ट केले की, अमळनेर परिसरात नवीन सेवास्थानाने मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी अधिक कार्यक्रम, उपक्रम राबविण्यास मदत मिळणार आहे. ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी उपक्रमास आशीर्वाद दिले.
तत्पूर्वी शांती सरोवर राजयोग अभ्यासकेंद्राचे भूमिपूजन माऊंट आबूच्या सह मुख्य प्रशासिका ब्रह्माकुमारी संतोषदीदीजी, जळगावच्या उपक्षेत्रीय निर्देशिका ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, अमळनेर सेवाकेंद्राच्या संचालिका मिरादीदी, विद्यादीदी, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील, श्रीमती स्मिता वाघ, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, उद्योजक बजरंग अग्रवाल, बी.के. सुरेश भाई, वरिष्ठ राजयोगी मधुकरभाई, जळगावचे महाराष्ट्र मीडिया प्रमुख तथा मीडिया विंग ब्रह्माकुमारीज् माऊंट आबूचे डॉ. सोमनाथ वडनेरे, जळगावचे उद्योजक धीरजभाई सोनी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रा. वसुंधरा लांडगे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार केला. यावेळी कु. साक्षी हिने स्वागतनृत्य सादर केले. सुत्रसंचलन बी.के. रुपाली बहन, अजमेर तर बी.के. हरीश्चंद्र भाई यांनी आभार मानले.