ज्योती पावरा यांनी डॉ.चंद्रकांत बारेला यांना बांधली राखी
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आणि पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांची राजकारणातील चाणाक्षता सर्वज्ञात आहे. मात्र, त्याप्रमाणे त्यांनी केलेली एक कृती त्यांच्या मानवीयतेचे प्रतीक ठरली आहे.एकाच कुटुंबातील दोन भावा-बहिणींच्या दुराव्याला त्यांनी दूर करण्याचा पुढाकार घेतला आणि एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे दोघा भाईंनी भावा-बहिणीतील कौटुंबिक कटुता संपविली आहे. याप्रसंगी वसंतभाई गुजराथी, आशिष गुजराथी, सुनील जैन, अतुल ठाकरे, सुनील पावरा, गोपाल सोनवणे, शशिकांत पाटील, इंद्रजित पाटील, किशोर दुसाने, अमोल राजपूत, सुरेश बारेला, सलीम तडवी आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पावरा आणि डॉ.चंद्रकांत बारेला हे दोघेही सख्खे भावंड आहेत. काही कारणास्तव त्यांच्यातील संबंध दुरावले होते. ही बाब गांभीर्याने दखल घेतली. एकत्र कुटुंब असावे त्याच्या महत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या अरुणभाई गुजराथी यांनी पुढाकार घेत रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त ज्योती पावरा आणि डॉ.चंद्रकांत बारेला यांना एकत्र बोलावले. संवादाच्या माध्यमातून त्यांनी या दुराव्याला वाचा फोडली आणि भावा-बहिणींच्या नात्यातील कटुता दूर केली.
संवादानंतर ज्योती पावरा यांनी आपल्या भावाला डॉ.चंद्रकांत बारेला यांना राखी बांधली. अशा राखी सोहळ्याने केवळ एकत्र कुटुंबाची महत्ता अधोरेखित केली नाही तर तालुक्यात आणि समाजात एक संदेश दिला की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुटुंबही महत्वाचे आहे. अशा मनोमिलन सोहळ्याने समाजात एक सकारात्मक संदेश सर्वत्र पसरला आहे. एकत्र कुटुंब असणे हे केवळ परंपरेचे प्रतीक नसून, कुटुंबातील नात्यांचे महत्त्व आणि सदभावना टिकविण्याचा मार्ग आहे. घेतलेला पुढाकार हे दाखवून देतो की, आपल्या समाजात आजही माणुसकी आणि कुटुंबप्रेम जिवंत आहे. राजकारणात सक्रिय असतानाही कुटुंबाच्या समस्यांकडे लक्ष देणे आणि त्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे हे खरे नेतृत्व आहे.
दोन्ही ‘भाईंचा पुढाकार’ समाजासाठी ठरला प्रेरणादायी
या घटनेने एकत्र कुटुंबाची महत्ता आणि भावंडांच्या नात्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांच्या भावनांचा आदर ठेवून एकत्र राहणे, हेच खरे सुख आहे. अरुणभाई गुजराथी आणि चंद्रहासभाई गुजराथी यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि त्यांच्याद्वारे घेतलेला पुढाकार, समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. मात्र, आज अरुणभाई गुजराथी यांनी पुढाकार घेत रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त ज्योती पावरा आणि डॉ.चंद्रकांत बारेला यांना कौटुंबिकदृष्ट्या एकत्र आणले असले तरी तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने दोन्ही भाऊ-बहीण राजकीय किती जवळ राहू शकतील, त्याचे उत्तर आगामी काळच देणार असल्याचा सूरही कार्यक्रमातून उमटला.