अधिकाऱ्यांनी दिले तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने, कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर मंगळवारी, ८ जुलैपासून साखळी उपोषण सुरू केले होते. २ कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ केला होता. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्त्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यावर दोघांनी अधिकाऱ्यांच्या हातून लस्सी पाजून उपोषण सोडले. त्यामुळे संघटनेत आनंदाचे वातावरण तयार होऊन प्रशासनाचे आभार मानले आहेत.
मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकानुसार १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश असताना आणि बदल्यांसाठीची टक्केवारी शिल्लक असतानाही कामगारांच्या बदल्या केल्या नसल्यामुळे कामगारांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. उपोषणाला कामगार संघटनेने पूर्ण पाठिंबा दर्शविला होता. मात्र, मंगळवारी रात्री उपोषणाच्या स्थळी जळगाव मंडळाचे महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी जळगाव विभागीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी आल्यावर उपोषणस्थळी भेट दिली. याप्रसंगी जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. मागणी मान्य करून उपोषण करणाऱ्या विकी पाटील आणि सुदर्शन सपकाळे यांचे उपोषण सोडविण्यात आले.