ग्रंथालयातील गोष्टीच्या पुस्तकांचे छोटेखानी भरवले प्रदर्शन
साईमत/यावल/प्रतिनिधी :
तालुक्यातील सांगवी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती यांच्या निमित्त डॉ. कलाम यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका रंजना सोनवणे होत्या. याप्रसंगी उपशिक्षिका जयश्री काळवीट यांनी विद्यार्थ्यांना डॉ.कलाम यांच्याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे डॉ.कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या ग्रंथालयातील गोष्टीच्या पुस्तकांचे छोटेखानी प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी केले.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी पुस्तक अभिवाचन उपक्रम ग्रंथालय प्रमुख जयश्री काळवीट यांनी आयोजित केला होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील गोष्टीची पुस्तके खुली करून देण्यात आली. उपक्रमात इयत्ता पहिली ते चवथीचे १० विद्यार्थी व दोन्ही शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षिका १ तासभर वाचनानंद घेण्यात रंगून गेले.
रोज एक तास वाचन करण्याचा उपदेश
जागतिक हात धुवा दिनानिमित्त मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक गाणे म्हणून करून दाखवले. सर्व विद्यार्थ्यांनी हात स्वच्छ धुतले. तसेच रोज स्वच्छ राहण्याचा संकल्प केला. अध्यक्षीय भाषणात रंजना सोनवणे यांनी सर्व मुलांना रोज एक तास वाचन करण्याचा उपदेश केला. तसेच रोज वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्यास सांगितले. सूत्रसंचालन तथा आभार उपशिक्षिका जयश्री काळवीट यांनी मानले.