जळगावातील रामेश्वर कॉलनी परिसरात पसरली शोककळा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
अमळनेर येथून मुलीचा एमबीएच्या सीईटीचा परीक्षेचा पेपर देऊन जळगाव शहरात परत येत असताना धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे भरधाव बोलेरोने स्विफ्ट कारला भीषण धडक दिली. धडकेत कारमधील पित्याचा मृत्यू तर मुलीसह आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील मयतात महेश सुरेश सोनार (वय ४५, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा समावेश आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी जळगावातील शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला होता.
सविस्तर असे की, जळगावातील रामेश्वर कॉलनी भागात महेश सोनार हे पिण्याच्या पाण्याच्या जारचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. महेश सोनार यांची मोठी मुलगी नयना हिचा एमबीए सीईटीचा पेपर असल्यामुळे त्यांना अमळनेर येथे जायचे होते. ते सकाळी कारने सीईटीचा पेपर देण्यासाठी मुलगी नयना आणि राजेश मिठूलाल धूत (वय ४६, रा. दौलत नगर, जळगाव) यांच्यासह अमळनेर येथे गेले होते. परीक्षा आटोपून परतताना दुपारी दीड वाजता धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ त्यांच्या स्विफ्ट कारला भरधाव बोलेरो वाहनाने जबर धडक दिली. त्यातील गंभीर जखमी तिघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तातडीने दाखल केले होते. रुग्णालयात दाखल केल्यावर तिघांपैकी महेश सुरेश सोनार यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. तसेच जखमी राजेश मिठूलाल धूत आणि नयना महेश सोनार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालयात नातेवाईकांसह मित्र परिवाराचा आक्रोश
अपघाताची माहिती मिळताच महेश सोनार यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. तसेच धरणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मयत महेश सोनार यांच्या अकस्मात मृत्यूमुळे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागात शोककळा पसरली आहे.