परदेशातून फसवणुकीतून मिळालेला पैसा भारतात आणण्याचे विविध मार्ग उघड
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील मुमराबाद शिवारातील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल.के. फॉर्म हाऊसमध्ये बोगस कॉल सेंटर चालवित असल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशा कॉल सेंटरद्वारे परदेशातील नागरिकांना फोन करून आर्थिक फसवणूक केली जात होती. पोलिसांनी रविवारी, २८ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता छापा टाकून संबंधित ठिकाणावर सात जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, अटक केलेल्या सात जणांना सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सांगितले की, कॉल सेंटरद्वारे अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांना ‘ॲमेझॉन कस्टमर केअर’ असल्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने एल.के. फॉर्म हाऊसवर छापा टाकला, जिथे देशी-विदेशी नागरिकांशी संपर्क करून आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.या ठिकाणाहून पोलिसांनी ३१ लॅपटॉप, सात मोबाईल, एक फ्रिज, काही डेबिट कार्ड व दोन हुक्का सेट जप्त केले आहेत. तसेच, परदेशातून फसवणुकीतून मिळालेला पैसा भारतात आणण्याचे विविध मार्ग उघड झाले आहेत.
११ जणांवर गुन्हा दाखल
सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मुस्तफा बेग हिसाबेक मिर्झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश चंदू आगारिया, ललित कोल्हे, नरेंद्र चंदू आगारिया, आदिल सैय्यद, इम्रान अकबर खान, अकबर (पूर्ण नाव माहित नाही), ऋषी (पूर्ण नाव माहित नाही), मोहम्मद जिशान नुरी, शाहबाज आलम, साकीब आलम व मोहम्मद हाशिर यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.