साईमत, जळगाव : प्रतिनिधी
सावखेडा शिवारातील जलराम नगरातून बेपत्ता झालेल्या ४३ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा गिरणा नदीच्या पत्रात मृतदेह आढळून आल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संतोष रामधन पाटील (वय ४५, रा. जलाराम नगर, सावखेडा शिवार, जळगाव) असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील जलराम नगरात संतोष पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने मानसिक स्थिती बरोबर नव्हती. त्यातच बुधवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले होते. याबाबत जळगाव तालुका पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. त्यांना शोधण्याचे काम सुरू असतांना गुरूवारी, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गिरणा नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला होता. शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास पो.हे.कॉ. अनिल मोरे करीत आहे.