साईमत, बोदवड : प्रतिनिधी
वरणगाव पोलीस स्टेशन बोदवड न्यायालयाला जोडण्यात यावे. कारण वरणगाव आणि परिसरातील गावे ही बोदवडच्या खरेदी विक्री ऑफीसला अगोदरच जोडलेली आहेत. त्यामुळे वरणगाव पोलीस स्टेशन बोदवड न्यायालयास जोडण्यास कोणतीही प्रशासकीय अडचण येणार नाही. तसेच बोदवड न्यायालयात कोर्ट कॅन्टींग, बोदवडला वरिष्ठ न्यायालय (सिनियर डीव्हीजन) सुरू करण्यात यावे, अशा विविध मागण्या वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायाधीशांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. यावेळी वकील संघातर्फे बोदवड न्यायालयातील असलेल्या समस्यांबाबत निवेदनही देण्यात आले.
जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेख यांनी बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयास नुकतीच भेट दिली. याप्रसंगी वकील कक्षात बोदवड तालुका वकील संघाने जिल्हा न्यायाधीश ए. एम. शेख यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी ॲड. अर्जुन पाटील यांच्यासह वकील उपस्थित होते.
बोदवड तालुका हा मध्यवर्ती ठिकाण असुन जामनेर तालुका, मुक्ताईनगर तालुका जवळ असल्यामुळे व पक्षकारांना येण्या-जाण्याकरीता बोदवड सोईस्कर आहे. तसेच बोदवडला दिवाणी व फौजदारी मॅटर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बोदवड येथे सिनीयर डीव्हीजन व्हावे, अशी मागणी बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व वकील मंडळी यांनी केली. त्यावर जिल्हा न्यायाधीशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला ॲड.सी.के.पाटील, ॲड.किशोर महाजन, ॲड.अमोल पाटील, ॲड. सुनील जाधव, ॲड. कळसकर, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पक्षकार वर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन तथा मनोगत बोदवड तालुका वकील संघाचे सचिव ॲड. धनराज प्रजापती, ॲड. के.एस.इंगळे यांनी व्यक्त केले.