लाडक्या बहिणींची ‘बंधु माया’ अन्‌ अपेक्षामुळे भाजपाचा विजय

0
9

रावेर विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक ठरली चुरशी, सर्व अंदाज, तर्क-वितर्क मतदारांनी ठरविले फोल

सुरेश पाटील, यावल प्रतिनिधी

संपूर्ण राज्यासह रावेर विधानसभा मतदारसंघात ७० ते ८० टक्के लाडक्या बहिणींच्या राजकीय माया आणि भावी अपेक्षांमुळे आपल्या रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी पक्षाचे, महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचा दणदणीत विजयी झाला. तसेच रावेर विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणींचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय तथा भक्कम असे उमेदवार धनंजय चौधरी यांनी समयसूचकता बाळगून मतदानाच्या दोन दिवस आधीच आपला राजकीय हात आवरून घेतला होता, अशी चर्चा रावेर विधानसभा क्षेत्रात आहे. रावेर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांसह व अपक्ष असे एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

प्रचारादरम्यान खरी लढत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, प्रहार, अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट चित्र होते. परंतु प्रहार पक्षाचे अनिल चौधरी यांना सुद्धा मागच्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले. तसेच दारा मोहम्मद, वंचितच्या उमेदवार शमीभा पाटील यांनाही अपेक्षेप्रमाणे मतदान झालेले नाही आणि हे अमोल जावळे यांना मिळालेली मते आणि महत्त्वाच्या दोन-तीन उमेदवारांना मिळालेली एकूण मते लक्षात घेतल्यावर तिन्ही उमेदवारांच्या आकडेवारीच्या पुढे भाजपला मतदान झाले. त्याचाच अर्थ असा निघतो की, रावेर विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणींच्या बंधू मायेमुळे आणि पुढील अपेक्षांमुळे भाजपाला भरघोस असे मतदान झाले.

काँग्रेसची समयसूचकता

रावेर विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दोन दिवसात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी जे सर्वतोपरी प्रयत्न केले आणि लाडक्या बहिणींचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता त्या राजकीय सुनामीत मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या उमेदवाराची सामाजिक, राजकीय, आर्थिक बाजू पूर्णपणे भक्कम असताना समयसूचकता बाळगून आपला हात आवरता घेऊन टाकला होता आणि कोणत्या उमेदवाराने मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त भटकंती करून विश्वासात घेतले आहे हे रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना (आकडेवारी व फुलीवरून) चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले असले तरी रावेर विधानसभा मतदारसंघात ज्या प्राथमिक मूलभूत समस्या आहे. त्याबाबत आणि सर्वांगिण विकासासाठी आता काय, काय प्रयत्न आणि नियोजन केले जाईल..? याकडे संपूर्ण राजकारणाचे लक्ष लागून राहणार आहे.

कोणाकोणाची डिपॉझिट जप्त होणार…?

यंदाची निवडणूक ही चुरशी ठरली. प्रत्येक उमेदवाराने निवडून येण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून मतदारांशी संपर्क साधला. मतदारांना मतांचा जोगवा मागून निवडून आणण्यासाठी आवाहन केले. मात्र, मतदारांनी सर्व अंदाज, तर्क-वितर्क फोल ठरवत अमोल जावळे यांना विजयी केले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघात नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील विजयी उमेदवार अमोल जावळे तसेच पराभूत झालेले धनंजय चौधरी, अनिल चौधरी यांना वगळता इतर उमेदवारांना कमी प्रमाणात मतदान झाल्याने त्यापैकी कोणाकोणाची डिपॉझिट रक्कम जप्त होणार? असा प्रश्न मतदार संघात उपस्थित होत आहे. प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यावर ज्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या निकषानुसार कमी मतदान झाले आहे. तसेच मतदार संघात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार अल्प मतदान मिळालेल्या उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त करण्याची कार्यवाही तथा आदेश दोन दिवसात काढले जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कोणाकोणाची डिपॉझिट जप्त होणार याकडे मतदारांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here