कार्यालयात मुलाखतीसाठी इच्छुकांच्या रांगा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवारांची निवड प्रक्रिया गतिमान केली आहे. पक्षाने सोमवारी, १५ डिसेंबर रोजी शहरातील जी.एम. फाउंडेशन भाजपा कार्यालयात निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची कसून चाचपणी सुरू केली आहे.
ही महत्त्वाची प्रक्रिया पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. या चाचपणीदरम्यान इच्छुकांचा जनसंपर्क, पक्षासाठी केलेले कार्य आणि निवडणुकीत विजय मिळवण्याची त्यांची क्षमता या निकषांवर तपासणी केली जात आहे. मुलाखती सत्राला मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन लढ्ढा यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्व नेत्यांनी संभाव्य उमेदवारांशी संवाद साधून त्यांच्या भूमिका आणि योजना जाणून घेतल्या.
गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित असल्याने इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मुलाखतीसाठी आलेल्या अनेक उमेदवारांशी संवाद साधल्यावर त्यांनी प्रभागात आपल्या कार्याचा आणि विजयाच्या आत्मविश्वासाचा पुनरुच्चार केल्याचे पहायला मिळाले.
