साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
देशातील सर्वसामान्य गरीब, पीडित, वंचित, महिला, युवक व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी १४ जानेवारी २०२४ पासून ‘भारत जोडो न्याय’ यात्रेला सुरूवात केल्याचे सर्वश्रुत आहे. मणिपूर येथुन निघालेली ही यात्रा नागालँड, अरुणाचल राज्यातील प्रवास पूर्ण करून आसाम राज्यात दाखल झालेली आहे. यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता भाजपा प्रणित आसाम राज्यात काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. त्यांच्या गुंडांनी ‘भारत जोडो न्याय’ यात्रेवर हल्ला केला. खा. राहुल गांधी यांची बस अडविण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्यात आसाम काँग्रेसचे अध्यक्ष भुपेन बोरा यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी, २३ जानेवारी २०२४ रोजी तहसिलदारांमार्फत जाहीर निषेध करून कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे.
सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी निघालेल्या ‘भारत जोडो न्याय’ यात्रेचा आवाज दाबणाऱ्या भाजपच्या विरोधात २३ जानेवारी रोजी तीव्र आंदोलन करून भाजप प्रणित गुंडगिरीचा निषेध केला. यावेळी मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे श्याम राठी, बंडु चौधरी, राजू पाटील, शिरीष डोरले, दिलीप गोळीवाले, प्रमोद अवसरमोल, जावेद कुरेशी, ईश्वर भदाले, प्रतीक जवरे यांच्यासह नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.