पहुरला राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी

0
62

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर

जळगाव-छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर वाघूर पुलाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. अशातच पहुरला राष्ट्रीय महामार्गावरील झालेल्या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरीकडे शनी महाराज मंदिराजवळील चौकात ‘भुलभुलय्या’ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती उपायोजना करून महामार्ग प्राधिकरणाने पुलाचे काम अधिक गतीने करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांकडून होत आहे.

छत्रपती संभाजी नगरकडून तसेच शेंदुर्णीकडून बस स्थानकाकडे येणारी वाहने अतिशय वेगात येतात. पूल परिसरात काम सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन योग्यप्रकारे लावणे आवश्‍यक आहे . शनी महाराज मंदिराकडे खाली उतरणारा रस्ता २० ते ३० फुटांपेक्षा अधिक खोल आहे. याठिकाणी सूचनाफलक योग्य प्रकारे लावण्यात आलेले नसल्याने वाहन चालकांचा संभ्रम होतो. याठिकाणी वक्राकार रस्ता असल्याने ‘भुलभुलय्या’सारखा प्रकार घडत आहे.

अशातच २९ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सोनू गजानन जाधव (रा. नवी सांगवी) हा दुचाकी स्वार धडकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉ. विशाल गायकवाड यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्यास जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here