साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
येथील जामनेर रस्त्यालगतच्या रामानंद नगर, दूर्गा कॉलनी परिसरातील कपिलेश्वर महादेव मंदिरातर्फे परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते. ही मिरवणूक परिसरातून सायंकाळी काढण्यात आली. शोभायात्रेत हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता.
सकाळी अकरा वाजेपासून मंदिर आवारात मंडप टाकून मोठ्या स्क्रीनद्वारे अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दाखविण्यात आला. शेकडो भाविकांनी मंडपात बसून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा लाभ घेतला. त्यानंतर महाआरती झाल्यावर प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी शोभायात्रेने मिरवणुकीची सुरूवात झाली. प्रभू श्रीरामाची भूमिका कुमारी भक्ती हिने, लक्ष्मणाची भूमिका सिद्धी हिने, सीतेची भूमिका लावण्या हिने तर हनुमानाची भूमिका दिशांत या मुलाने साकारली. परिसरातील विविध नगरांमधून शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सडा घालून रांगोळी काढण्यात आली होती. तसेच सजीव देखाव्यांची घराघरासमोर पूजाआरती करण्यात येत होती. मिरवणुकीदरम्यान तुषार सराफ यांच्या घरासमोर पाच जोडप्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली.
शोभायात्रा मंदिराच्या आवारात पोहोचल्यानंतर तेथे सामूहिकरित्या रामरक्षा स्तोत्र म्हणण्यात आले. त्याचे नेतृत्व चंद्रकांत महाराज आणि लक्ष्मण महाराज यांनी केले. यशस्वीतेसाठी कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
