साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
शहराच्या नजीकच असलेल्या कंडारी गावात काल रात्री उशीरा झालेल्या भयंकर घटनेत दोन सख्ख्या भावांचा खून झाला असून भुसावळात पहाटे एकाचा खून झाला आहे. एकाच रात्री तीन खून झाल्याने भुसावळ शहर हादरले असून गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कंडारी गावामध्ये रात्री दहा वाजता तू माझ्या भावाला शिवीगाळ का केली याची विचारणा केली असता जुनावाद उकरत दोन संख्या भावांना १० जणांनी मिळून संपवले. तर श्रीराम नगर मध्ये कुख्यात गुन्हेगार निखिल राजपूत याचा त्याच्या शालकाने खून केला याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात व कंडारी येथील प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
कंडारी येथील खुनांना जुन्या वादाची किनार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी गावातील शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील एक परीवाराशी जुना वाद होता. यातून त्यांच्यावर काल रात्री अकराच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात हल्लेखोरांनी साळुंखे बंधूंवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तलवारीसह चाकूचा सपासप वापर करण्यात आल्याने दोन्ही भावंड जागीच गतप्राण झाली तर इंगळे व साळुंखे नामक इसम जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
शालकानेच केला मेहुण्याचा‘गेम’
भुसावळसह परिसरातील गुन्हेगारीच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात निखील राजपूतची प्रचंड दहशत पसरली होती. खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, खंडणी, धमक्या अशा अनेक प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र तो अगदी पोलिसांना देखील जुमानत नव्हता. दरम्यान, काल रात्री श्रीराम नगर मधील आपल्या राहत्या घराजवळ अमृत योजनेच्या पाण्याच्या टाकीच्या वरील भागास आपल्या सहकार्यांसह झोपला होता. याप्रसंगी निखील राजपूतवर धारदार शस्त्राने वार झाल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला. निखील हा पाण्याच्या टाकीवर झोपत असल्याची माहिती त्याला असल्याने त्याने टाकीवर चढून निखीलवर वार केले. याप्रसंगी निखीलसोबत काही जण देखील होते. मात्र त्यांना काही कळण्याच्या आतच मारेकर्याने पलायन केले. पोलिसांनी तपास केला असता सदर आरोपी हा निलेश चंद्रकांत ठाकूर (वय २२, रा. कंडारी, ता. भुसावळ ) असल्याची माहिती मिळाली. त्याला बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली. दरम्यान, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.
यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निखील राजपूतचा खून करणारा आरोपी हा त्याचाच शालक अर्थात पत्नीचा भाऊ असल्याची माहिती समोर आली. निखीलने आधी आपल्या समाजातील तरूणीशी विवाह केला होता. तिला घटस्फोट दिल्यानंतर त्याने आंतरजातीय विवाह केला होता. यानंतर तो आपल्या पत्नीला खूप त्रास देत असे. त्याचे काही महिलांशी विवाहबाह्य संबंध देखील होते. यातून अनेकदा वाद देखील झाले होते. याच वादातून शालकाने थेट आपल्या मेहुण्याचाच गेम केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.