गुन्हेगारीवर पोलिसांचा कडक बडगा; शहरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
साईमत भुसावळ प्रतिनिधी
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ उपविभागीय पोलिसांनी धडक ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारी प्रवृत्तींवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. या विशेष मोहिमेत बाजारपेठ पोलिसांनी तब्बल 14 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली असून, दोन फरार आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे.
या कारवाईत आर्म अॅक्ट तसेच चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयित व आरोपींची सखोल तपासणी करण्यात आली. यामध्ये पोलिसांच्या रडारवर असलेले दोन फरार आरोपी जेरबंद करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये समीर शहा जब्बार शहा उर्फ डमरू आणि केवल अनिल टाक (दोघे रा. भुसावळ) यांचा समावेश आहे. हे दोघेही गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होते. त्यांच्या अटकेमुळे काही प्रलंबित गुन्ह्यांच्या उलगड्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान तपासण्यात आलेल्या आरोपींपैकी रेकॉर्डवरील चार जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या नियोजनबद्ध आणि आक्रमक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी हालचालींवर मोठा आळा बसणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांनी निर्धास्तपणे उत्सव साजरे करावेत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे, महेंद्र पाटील, हर्षल महाजन, जीवन काकडे, चंद्रकांत रायपूरकर, दिलीप कोल्हे, अक्षय कोतकर, अमर अढाळे, जावेद शहा, भूषण चौधरी, प्रशांत सोनार यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
दरम्यान, पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. भविष्यातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले असून, नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
