दारूच्या नशेत पतीने मारहाण, सासरच्या मंडळींनी पाठबळ; पोलीस तपास सुरू
साईमत / भुसावळ / प्रतिनिधी
भुसावळ भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील रिता मुकेश सुतार यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करून माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता पती मुकेश गजानन सुतार आणि सासरच्या ५ इतर सदस्यांविरुद्ध भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीनुसार, विवाह २०१२ मध्ये रितीरिवाजानुसार झाल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी नंतर पती आणि सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. पती वारंवार दारूच्या नशेत घरी येऊन शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच, “तुझ्या माहेरून १ लाख रुपये आण” अशी मागणी करत सासरच्या इतर सदस्यांनी देखील मानसिक आणि शारीरिक त्रास दिला.
भुसावळ पोलीसांनी पती मुकेश गजानन सुतार, चुलत दीर ललित हेमराज सुतार, हर्षल निवृत्ती सुतार, चुलत सासू दुर्गाबाई हेमराज सुतार, चुलत सासरे हेमराज बाबुराव सुतार (सर्व रा. मोरगाव, ता. रावेर) आणि आते सासू पद्माबाई श्रीधर रुले (रा. साकळी, ता. यावल) अशा एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
भुसावळ पोलीस तपास पोहेकॉ महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे करत आहेत.
