दहा वर्षापासून होरपळ तरीही ठेवीदारांच्या ‘मरणकळा’ संपता संपेना
साईमत। जळगाव। सुरेश उज्जैनवाल
येथील बहुचर्चित भाईचंद हिराचंद रायसोनी म्हणजे बीएचआर पतसंस्थेच्या अवसयाक पदावर असलेल्या सहकारातील सहाय्यक निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यासह सोबत एकाला लाच लुचपत खात्याने दीड लाखाची रक्कम स्वीकारतांना मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी रंगेहात अटक केली. याच संस्थेच्या संचालकांनी २०१४ मध्ये केलेला घोटाळा सुमारे ९० हजार ठेवीदारांच्या एक हजार ३०० कोटींची रक्कम परतावा अडचणीत आणणारा ठरला. यामुळे संचालकांवर दाखल ९० ठिकाणच्या गुन्ह्यांत त्यांना झालेली अटक त्यात त्यांच्या या तुरुंगातून त्या तुरुंगात झालेल्या वाऱ्या केवळ शिक्षा म्हणून नावापूरत्या ठरल्या.संचालक मंडळ बरखास्त झाल्यावर शासनाच्या नियुक्त सहकार खात्याच्या दोनही अधिकाऱ्यांनी घोटाळ्यात घोटाळे केल्याने या संस्थेला वारंवार घोटाळयाचे जणू ग्रहणच लागले आहे.या सर्व चक्रात बळी घेतला गेला तो ठेवीदारांचा! आपल्या घामाच्या आणि हक्काच्या रकमेतून गेल्या दहा वर्षात अद्यापपर्यंत दमडी सुद्धा पदरात न पडलेल्या या ठेवीदारांच्या हिताचे पाहणारे कुणी वाली आहेत की नाही? असा प्रश्न पुढे येत आहे.
संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी उर्फ अंकल व त्यांच्यासमवेत १४ संचालकांच्या घोटाळ्यानंतर संस्था अवसायनात काढल्यावर राज्य सहकार आयुक्त यांच्या शिफारसीने केंद्रीय सहकार निबंधक यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये तत्कालीन यवतमाळ जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांना अवसायक म्हणून नियुक्त केले. त्याच्या कार्यकाळात संस्थेच्या मालमत्ता विकतांना लिलाव प्रक्रियेत घोटाळा करून ठेवीदारांच्या ठेवी मॅचिंग करून फसवणूक करण्याचा ठपका ठेवत जितेंद्र कंडारे यांच्यासह संस्थेचे लिपिक सुजित वाणी, लेखापरीक्षक महावीर जैन,धरम साखला,प्रकाश वाणी,ठेवीदार संघटनेचा नेता विवेक ठाकरे,अनिल पगारिया, उदयकुमार कांकरिया, रमेश जैन,कमलाकर कोळी, लिलावात मालमत्ता घेणारा सुनील झवर,त्याचा मुलगा सूरज झवर,लिलावाचे सॉफ्टवेअर बनवणारा कुणाल शहा, कर्जदार असलेले योगेश सांखला,भागवत भंगाळे,प्रेम कोगटा, जयश्री अंतिम तोतला, जितेंद्र पाटील, छगन झाल्टे, अंबादास मानकापे, आसिफ मुन्ना तेली, जयश्री मणियार, संजय तोतला, राजेश लोढा, प्रितेश जैन, माजी आमदार चंदूलाल पटेल, अश्विन शाह, रवींद्र कापसे, राजेश वर्मा अशा ३१ जणांवर पुण्यात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण प्रचंड गाजले होते. कंडारे यांस अटक झाल्याने नागपूर येथून चैतन्य नासरे यास २०२१ अवसायक नेमले गेले. मात्र धुतल्या तांदळासारखी वागणूक दाखवणारा हा माणूस सुद्धा कालच्या लाच स्वीकारण्याच्या प्रकरणामुळे ठगबाजच होता हे सिद्ध झाल्याने एकूण दहा वर्षाच्या काळात ठेवीदारांना न्याय मिळालाच नाही पुढील काळात सुद्धा याची कुण्याही राजकीय पुढाऱ्यांना अथवा शासकीय अधिकाऱ्यांना चिंता नसल्यास या संस्थेतील एक हजार ३०० कोटींच्या ठेवी व तब्बल तेवढ्याच कर्जाची रक्कम अशा अडीच ते तीन हजार कोटींच्या व्यवहाराला जबाबदार कोण ? ही अत्यंत गंभीर बाब म्हटली पाहिजे.
एमपीआयडी कायदा फक्त नावाला
प्रमोद रायसोनी आणि तत्कालीन गैरव्यवहारात समाविष्ट संचालक व त्यांच्या नातेवाईक यांना आरोपी करून पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत महाराष्ट्र ठेवीदार गुंतवणूक अधिनियमानुसार म्हणजे एमपीआयडी कलमात संचालकांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करून विक्रीतून आलेल्या रकमेतून फक्त नव्वद दिवसात तक्रारदार ठेवीदारांना ठेवी परत करण्याची तरतूद असतांना ९० दिवस तर सोडाच याच्या ३६पट म्हणजे तीन हजार ३०० दिवस होऊनही या कलमाचे हत्यार ठेवीदारांसाठी उपयोगात येत नसेल तर उपयोग काय किंवा नेमके घोडे अडलेय कुठे ? असा प्रश्न आता ठेवीदार व्यक्त करीत आहेत.