वरणगावातील ‘भोगावतीला’ पूर : पूर पाहण्यासाठी उसळली गर्दी

0
51

व्यापारी संकुलात पाणी घुसल्याने व्यवसायिकांचे नुकसान

साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :

बोदवड तालुक्यातील उजनी येथे उगमस्थान असलेल्या भोगावती नदीला सोमवारी, २ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मोठा पूर आला. त्यामुळे वरणगाव शहरातील नदी पात्रालगतच्या व्यापारी संकुलात पाण्याचा शिरकाव झाल्याने व्यवसायिकांचे नुकसान झाले. बऱ्याच वर्षानंतर नदीला पूर आल्याने नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.

वरणगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून भोगावती नदी आहे. नदीचे उगमस्थान बोदवड तालुक्यातील हिंदू – मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत न्यामतुल्ला शाह वली पिर बाबा दर्गा उजनी येथुन आहे. नदीला ५० वर्षांपूर्वी बाराही महिने शुद्ध स्वरूपाचे पाणी वाहत होते. मात्र, काळाच्या ओघात नदीचे स्वरूप बदलले आहे. पावसाळ्याच्या दिवसात बोदवड तालुक्यातील उजनी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास नदीला पूर येतो. तसेच नदीच्या पुराने अनेकांचे जीव (भोग) घेतले असल्याने नदीला भोगावती, असे संबोधले जात असल्याचे सांगितले जाते.

भोगावती नदीला सोमवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पूर आल्याने भोगावती नदी पात्रालगत रहिवाशी असलेल्या सुफियाबी शेख शेरू, संजय बाबुराव कोळी यांच्या प्रत्येकी दोन बकऱ्या वाहून गेल्या. तसेच अहमद कुरेशी यांचा बांधलेल्या बैलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रेणुका माता मंदिराच्या पायऱ्याजवळ पाणी आल्याने या भागात असलेल्या नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाले. याबाबत माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शिवसेनेचे शेख सईद शेख भिकारी, राष्ट्रवादीचे समाधान चौधरी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी शासनाकडे पंचनामा करण्याची मागणी केली आहे.

भोगावतीला १५ वर्षानंतर आला पहिलाच पूर

भोगावती नदीला किमान १५ वर्षानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात पूर आल्याची माहिती कर्णोपकर्णी पोहचताच पूर पाहण्यासाठी नदी पात्रालगत नागरिकांची गर्दी उसळली होती. पुराचे पाणी नदी पात्रालगत बांधण्यात आलेल्या नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयातही शिरले होते. तसेच पुराच्या पाण्याने आठवडे बाजारातही शिरकाव केला होता. मात्र, काही तासातच पुराचे पाणी ओसरल्याने नदी पात्रालगतच्या रहिवाशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here