३० हजार सिंधी बांधवांकडून सेवा, विविध संतांचे भजन-कीर्तनाने धार्मिक वातावरण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
अखंड पाठ साहेब आणि अखंड रामायण वाचनाचे भोग साहेब (समाप्ती) कार्यक्रम वर्सी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे पार पडला. यासाठी देशभरातून भाविक आले होते तर शहरातील संपूर्ण सिंधी बांधवांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. सुमारे ३० हजार बांधवांनी व्यवसाय बंद करून सेवा केली, त्यात पुरुषांसह महिलांसाठी स्वतंत्र भोजनाची व्यवस्था केली होती. संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. आलेल्या भाविकांनी अतिशय आनंद व्यक्त केला. पूज्य सेवा मंडळाची नवीन वास्तू पाहून आनंदात भर पडली. कार्यक्रमाला मंत्री गिरीष महाजन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा भवरलाल जैन यांचे सुपुत्र अशोक जैन, ज्येष्ठ पत्रकार विजय दर्डा, माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार राजू मामा भोळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी सात वाजता भोग साहेबांचा कार्यक्रम सुरू झाला. संत बाबा गेलाराम साहेब यांचे शिष्य देविदास भाई अमरावती, संत कवाराम साहेब यांचे पणतू साई राजेशलाल, रायपूरहून आलेले साई युधिष्ठरलाल, सतनाहून आलेले साई किशोरीलाल, साई फकीरालाल नागपूर, अम्मा चोले वारी रायपूर, साई बलराम उल्हासनगर, साई हरिराम उज्जैन, साई बिरबलदास के सुपुत्र डबरा, साई अर्जुनदास उल्हासनगर यांनी सत्संग व भजन करून पाठ साहेबाची समाप्ती केली. रात्री संत बाबा हरदासराम, संत गेलाराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भजनांचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये विशनी ईसराणी (गांधीधाम), रतन जाधवानी, जळगावातील सहकारी, सिंगर बेबी कशीश, सिंगर बेबी फ्रांसी राजकोट यांचे सादरीकरण उपस्थितांची मने जिंकणारे ठरले. सोमवारी, १३ ऑक्टोबर रोजी पल्लव साहेब कार्यक्रमाद्वारे वर्सी महोत्सव पार पडणार आहे, ज्यामध्ये भाविकांच्या घरात सुख-शांती, धन-धान्याची भरभराट व्हावी, अशी प्रार्थना केली जाईल.
यांनी घेतले परिश्रम
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अमर शहीर संत कंवरराम ट्रस्टवतीने राम कटारिया, अशोक मंधाण, रमेश मतानी, राजकुमार आडवाणी, जगदीश कुकरेजा, गुरुमुखदास तलरेजा, राजकुमार वाळे तसेच सर्व ट्रस्टचे पदाधिकारी, पूज्य पंचायतचे सदस्य, बाबांचे सेवेकरी महिला मंडळ यांच्यासह संपूर्ण समाज बांधवांनी परिश्रम घेतले.