साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील ‘संस्कार भारती’तर्फे भरतमुनी जयंतीनिमित्त नुकताच भरतमुनी स्मरण दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला दीप प्रज्ज्वलन, नटराज पूजन आणि भरतमुनी प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी देवगिरी प्रांत नाट्यविधाप्रमुख श्रीमती सुनिता घाटे, जळगाव विभाग प्रमुख रवींद्र देशपांडे, चाळीसगाव समितीचे नाट्यविधाप्रमुख डॉ.निलेश देशपांडे, अध्यक्ष गितेश कोटस्थाने, उपाध्यक्ष शंकर पाठक सचिव विवेक घाटे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारती गीताने झाली.
यानंतर डॉ.निलेश देशपांडे यांनी नाट्यशास्त्राचा इतिहास मराठी नाटक आणि रंगभूमीचा उगम व इतिहास याविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी शुभांगी संन्यासी यांनी ‘संवेदनशीलता’ स्वलिखित लेखाचे अभिवाचन केले. उपाध्यक्ष आणि संगीत विभाग प्रमुख शंकर पाठक यांनी ‘गुंतता हृदय’ हे नाट्यगीत सादर केले. यानंतर रत्नप्रभा नेरकर यांनी ‘कान्होपात्रा’ यांचे उत्तम असे सादरीकरण केले. नंतर श्री. हातलेकर यांनी ‘ऋणानुबंध’ हे नाट्यगीत सादर केले.
देवगिरी प्रांत नाट्यविधा प्रमुख सुनिता घाटे यांनी ‘ती फुलराणी’ नाटकातील काही अंश एकपात्री पद्धतीने सादर केले. लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ नाट्यगीत सादर केले. त्यानंतर ‘धुरंधर महानायक’ या स्वामी विज्ञानानंद यांच्या चरित्रावर आधारित अभिवाचन रवींद्र देशपांडे, मनीषा देशपांडे यांनी सादर केले. त्यानंतर सुहासिनी पाठक यांनी ‘देवाघरच्या फुला सोनुल्या’ हे गीत सादर केले. रमेश पोद्दार यांनी शेवटी एक काव्यरचना व गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.
यशस्वीतेसाठी प्रकाश कुलकर्णी, शालिग्राम निकम, प्रा.र. वि.नेरकर, दिलीप संन्यासी यांनी परिश्रम घेतले.