साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ आणि ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन अँन्ड आर्टिस्ट युनियनतर्फे विविध क्षेत्रात अष्टपैलु कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यातील तळेगावचे अनिल पगारे यांचा समावेश आहे. सामाजिक कार्याची व समाजाप्रती असलेल्या निस्वार्थ भावनेचा कर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार ना.रामदास आठवले, शेखर मुंदडा (अध्यक्ष, गोसेवा आयोग महाराष्ट्र), अविनाश महातेकर (माजी राज्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग), सिनेकलावंत आणि मान्यवरांच्या हस्ते येत्या शनिवारी, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील कस्तुरबा महिला मंडळाच्या हॉल माटुंगा येथे दिला जाणार आहे.
अनिल पगारे हे स्त्री-पुरुष समानता, व्यसनमुक्ती, आरोग्य, संविधान जनजागृती, शिक्षण, स्वच्छता तसेच मागासवर्गीयांना शासकीय योजनांची माहिती, अंधश्रध्दा आदींबाबत जनजागृतीचे कार्यक्रम २००६ पासून लोकसहभागातून राबवित आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘भीमरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.