गीतादास ह.भ.प. चंद्रकांत महाराज यांचे प्रतिपादन : दिंडी मिरवणुकीसह काल्याच्या किर्तनाने सप्ताहाचा समारोप
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
श्रीमद् भागवत कथा ही भारतीय संस्कृतीतील एक अतिशय पवित्र व ज्ञानप्रद ग्रंथकथा आहे. या कथेच्या श्रवणाने मनातील दुःख, चिंता व क्लेश नाहीसे होतात आणि भक्ती, शांती व आनंदाची अनुभूती मिळते. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनचरित्राबरोबरच धर्म, भक्ति, ज्ञान व वैराग्य यांचे सखोल विवेचन आहे. कथा ऐकणाऱ्याच्या मनात सद्गुणांची वाढ होते, वाईट प्रवृत्ती कमी होतात आणि अध्यात्मिक उन्नती साधता येते. भागवत कथा ही केवळ धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथकथा नसून ती जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी, आत्मशुद्धी करणारी व परमेश्वराशी जोडणारी साधना आहे, असे प्रतिपादन कथावाचक गीतादास ह.भ.प. चंद्रकांत महाराज यांनी येथे केले. भुसावळ येथील रामानंद नगरात आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहात ते बोलत होते.
सातदिवसीय कथा सप्ताहात त्यांनी पुराणांची महती, व्यास-शुक संवाद भागवत महात्म्य व कथा ऐकण्याचे महत्व, सृष्टी निर्मिती, वराहावतार, ध्रुवचरित्र, प्रह्लाद व हिरण्यकश्यपू यांची कथा, मनु-शतरूपा व पौराणिक वंश, भगवान वामनावतार, बलिराजा, भगवान रामकथा संक्षेप, कृष्णावताराची भूमिका, गोकुळातील बाललीला, गोवर्धन पर्वताची कथा, श्रीकृष्णाची रासलीला व भक्तिरसाचे वर्णन, उद्धव-गोपी संवाद, भक्तीमार्गाचे महत्व, कौरव-पांडव कथा, कुरुक्षेत्र युद्धाचे प्रसंग, विदुर, मैत्रेय संवाद, भक्तांचे आदर्श जीवन, श्रीकृष्णाचे द्वारकेतील जीवन व लीला, महाभारत समाप्ती, श्रीकृष्ण निर्वाण, परीक्षिताला मिळालेली मुक्ती, भागवत महात्म्य याविषयीची माहिती श्रोत्यांना दिली. सप्ताहात लक्ष्मण महाराज, शरद महाराज, किशोर महाराज, संजय महाराज, रामसिंग महाराज, डॉ. लक्ष्मीकांत महाराज, भूपेश महाराज, चंपालाल बडगुजर, सचिन महाराज, लक्ष्मण चौधरी, प्रल्हाद महाराज, सुपडू दांडेकर, अर्जुन ढाके, होमराज पाचपांडे, वसंत बऱ्हाटे, मुरली लोखंडे, अतुल वायकोळे, प्रेमचंद फेगडे, सुरेंद्रसिंग पाटील, डॉ. जगदीश पाटील यांच्यासह भाविकांनी सहभाग घेतला.
जागोजागी दिंडीचे स्वागत
समारोपाला परिसरातून श्रीमद् भागवत ग्रंथाची मिरवणूक व दिंडी काढण्यात आली. जागोजागी दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीत पावल्या व फुगडी खेळून आनंद व्यक्त करण्यात आला. सप्ताह सांगता प्रसंगी हभप किशोर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. ‘दुडीवर दुडी गवळण साथे निघाली’ अभंगावर बोलताना ते म्हणाले की, जीव शिवाचे ऐक्य म्हणजे काला होय. श्रीकृष्णाने वाळवंटात काला केला. गोकुळातील सवंगड्यांसोबत काला वाटून खाल्ला. ते फक्त जेवण नव्हते तर भक्तांशी स्नेहाचे, प्रेमाचे बंधन होते. संसारातील काला हा नश्वर आहे, पण नामरूपी काला, जीव-शिवाचे ऐक्य देणारा काला हाच शाश्वत आहे. संतांनी हाच काला आध्यात्मिक मिलनाचा प्रतीक मानला. त्यामुळे आपण सारे मिळून रामकृष्णहरी, रामकृष्णहरी हाच हरिनामाचा काला करू या, असे आवाहनही ह.भ.प. किशोर महाराज यांनी काल्याच्या कीर्तनात केले.