भारतीय संस्कृतीचे रंगतदार दर्शन ; कलाकारांवर बक्षीसांचा वर्षाव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेत नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम ‘आनंदोत्सव–२०२५’ उत्साहात आणि दिमाखात पार पडला. इयत्ता पाचवी ते दहावीतील तब्बल ३०० विद्यार्थी कलाकारांनी सहभाग नोंदवून पंजाबी, कोळी, कथ्थक, घुमर, भारुड, नटरंग, महाकाली आदी १४ बहारदार व नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर केले. दमदार सादरीकरणामुळे प्रेक्षक अक्षरशः दोन तास मंत्रमुग्ध झाले. उत्कृष्ट सादरीकरणासाठी कलाकारांना १५ हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रमोद चांदसरकर, उपाध्यक्षा सीमा चांदसरकर, शालेय समिती अध्यक्षा सुप्रिया चांदसरकर, सचिव राजेंद्र वाणी, संचालक निलेश भांडारकर, कलाशिक्षक एस. डी. भिरुड, उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील आदी उपस्थित होते.
कलाकारांना कोरियोग्राफर लक्ष्मीकांत सपकाळे तसेच सांस्कृतिक समिती प्रमुख व संगीत शिक्षक राजू क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. निकम, सूत्रसंचालन डॉ. अशोक पारधे तर डॉ. आर. डी. कोळी यांनी आभार मानले.
सादर केलेली नृत्ये
कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांमध्ये श्रीगणेश वंदना, तारक मेहता का उल्टा चश्मा, स्कूल चले हम, कोळी गीत, वाघ्या-मुरळी (गोंधळ), पंजाबी नृत्य, कथ्थक नृत्य, जय शिवराय, राजस्थानी घुमर, डान्स धमाका, नटरंग, महाकाली, भारुड, वंदे मातरम आदींचा समावेश होता.
