
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कुलमधील प्रांगणात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. उत्साह, श्रद्धा आणि कृतज्ञतेच्या भावनेत साजरा झालेला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.पी. निकम होते. कार्यक्रम समिती प्रमुख म्हणून डॉ. अशोक पारधे, डॉ. आर.डी. कोळी, अर्चना कोठावदे, सुनील तायडे, हर्षला जगताप, पर्यवेक्षक के.आर. पाटील आदी उपस्थित होते.
सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध सादरीकरणे केली. त्यात अक्षर जिरंगे, वर्षा सूर्यवंशी, ओम रुले, कीर्तिका पाटील, नकुल हजारे, अक्षरा बोरडे, जयश्री निकम, लक्ष्मी राठोड, युवराज चव्हाण, अंश शेजवळ, स्वामी पाटील यांनी महामानवाच्या विचारांवर मत व्यक्त केले. तसेच लावण्या तायडे यांनी त्यांच्यावर आधारित सुमधुर गीत सादर केले.
कार्यक्रमात डॉ. आर.डी. कोळी यांनी महामानवाच्या जीवनावर आधारित “उपकार” कविता विद्यार्थ्यांसमवेत सादर केली तर डॉ. अशोक पारधे यांनी त्यांच्या जीवन संघर्षावर आधारित कविता व विचार मांडले. हर्षला जगताप यांनी विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक विचारांवर मत मांडले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एस.पी. निकम यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा उहापोह करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच त्यांनी एक सुमधुर कविता सादर केली. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन सुनील तायडे तर आभार रूपाली कोठावदे यांनी मानले.


