कार्तिक मास व दीपदानाचे महात्म्य उलगडले
साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :
श्रील प्रभुपाद मार्ग, वरखेड़ी रोडवरील श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिरात भगवद्गीता साप्ताहिक सत्संग भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमात इस्कॉनचे प्रवचनकार श्रीमान यदुवंशी प्रभुजी यांनी “कार्तिक मास की महिमा एवं दीपदान का महत्व” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन दिले.
प्रभुजींनी सांगितले की, कार्तिक महिना हा भगवान श्रीहरि विष्णूला अत्यंत प्रिय असून या काळात श्रद्धेपूर्वक केलेले दीपदान सर्व पापांचे नाश करून भक्ताला परमशांती व मोक्ष प्रदान करते. स्त्री असो किंवा पुरुष, जो कार्तिक महिन्यात भगवान विष्णूला दीप अर्पण करतो त्याला मृत्यूनंतर यमलोकाचे दर्शन होत नाही. दीपदान हे केवळ बाह्य प्रकाश नसून अंतःकरणातील अंधकार दूर करणारे आणि भक्तिभाव जागवणारे साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमादरम्यान कथा, कीर्तन व हरिनाम संकीर्तन यांमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
अनेक भक्तांनी उपस्थित राहून “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे” या महामंत्राचा अखंड जप केला.वातावरण भक्तिभाव, शांतता आणि आनंदाने भरून गेले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित भक्तांना श्री जगन्नाथजींचे स्वादिष्ट महाप्रसाद देण्यात आले. प्रवचनाच्या अखेरीस श्रीमान यदुवंशी प्रभुजींनी सर्वांना आवाहन केले की या कार्तिक महिन्यात दररोज भगवान श्रीहरिला दीप अर्पण करा, कारण भक्तिभावाने केलेले दीपदान हेच मोक्षाचा मार्ग दर्शवते आणि जीवनात सत्य, प्रेम व प्रकाशाचा प्रसार घडवते.