टोणगाव शिवारातील झाडतोडीवरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका; दैनिक साईमतने घेतली दखल, वन विभागाच्या तपासणीनंतर प्रकरणाला नवे वळण
साईमत भडगाव प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील टोणगाव शिवारातील गट क्रमांक ५६१/१ मध्ये सुरू असलेल्या झाडतोडीच्या प्रकरणाने स्थानिक नागरिकांत खळबळ उडवली आहे. सलीम सखावत खान यांनी या संदर्भात भडगाव तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करत शेकडो झाडे तोडल्याचा गंभीर आरोप केला होता. दैनिक साईमतने या विषयाची दखल घेतल्यानंतर प्रशासनालाही हालचाल करावी लागली.
या प्रकरणात आरोप झालेल्या गट मालक कादिर खान हाजी जोरावर खान यांनी २२ ऑक्टोबर २०२५ रोजी भडगाव शहरातील सुंदरबन फार्म येथे पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, “सदर झाडतोड पूर्णतः कायदेशीर मार्गाने करण्यात आली आहे. भडगाव नगरपरिषद तसेच वन विभागाकडून लेखी परवानगी घेतली असून वाहतूक परवाना देखील प्राप्त आहे.”
कादिर खान यांनी स्पष्ट केले की, “तक्रारदार सलीम सखावत खान यांनी २०० ते ३०० झाडे तोडल्याचा आरोप केला आहे, परंतु वास्तवात त्या ठिकाणी केवळ १४ ते १५ झाडे होती.” त्यांनी पुढे सांगितले की, वन विभागाचे अधिकारी सरिता पाटील, वनपाल नंदू पाटील तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी स्थळ पाहणी करून पंचनामा केला आहे.
पत्रकार परिषदेत कादिर खान यांनी तक्रारदारावर आरोप करत सांगितले की, “खोट्या तक्रारींमुळे आम्हाला विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व परवानग्या असतानाही चुकीची माहिती देऊन जनतेत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला.” त्यांनी प्रशासनाकडे खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी भडगाव नगरपरिषद आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाकडून सुरू आहे. वृक्षतोडीच्या परवानग्या, पंचनामे आणि वाहतूक नोंदी यांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे समजते.
ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून, पर्यावरण रक्षण आणि जबाबदार विकास यामधील समतोल राखण्याची गरज अधोरेखित करते. “वृक्षतोड म्हणजे केवळ विकास नव्हे, तर जागरूकतेची चाचणी आहे,” अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी दिली.



