साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
भडगाव तालुक्यात रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी मुसळधार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सावदे, गुढे, घुसर्डी या गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेती व फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा असमानी संकटामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे. त्यामुळे ओला झालेला कापूस आता शेतकऱ्याला कवडी मोल भावाला विकावा लागणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठे संकटात सापडले आहे. शासनाने महसुल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.