साईमत मुंबई प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtawadi Congress) पक्षात मोठे बदल केले जात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरविण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली आहेत. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदावर प्रश्न विचारण्यात आले.
तुम्ही कार्याध्यक्ष झाल्या पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान जर तुमच्या वाट्याला आला तर तुम्ही त्याला पसंती द्याल का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. मुख्यमंत्री पदाला एकतर पुरुष अथवा महिला असा भेद नसतो. ना पुरुष, ना महिला दुसरे म्हणजे मुख्यमंत्रीपद हे अशाच व्यक्तीला मिळायला पाहिजे, जो यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. ते नुसते पद नाही, ती खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्या पदाला जेंडरमध्ये बांधून ठेवणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री कर्तृत्ववान असायला हवा.
पक्षाला वाटलं जर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळावी, तर तुम्ही इच्छुक असाल का? या प्रश्नावर सुळे यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला. मी कशाचीच इच्छा बाळगत नाही. जे आपल्या हातात नसते, त्याची इच्छा काय ठेवायची. मी राजकारणात कशासाठी आले, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. मी पॉलिसी लेवलला काम करून, लोकांच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मी भाऊ म्हणून नेता म्हणून अजितदादाच्या (Ajit Pawar)संपर्कात होते. मात्र, पहाटेच्या शपथविधीची मला माहिती नव्हती. मला सदानंद सुळे यांनी शपथविधीची माहिती दिली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnwis) मुलाखतीत स्पष्ट मत मांडले आहे. दादाच्या मनात काय घालमेल झाला मला माहिती नाही. तुम्ही किती दिवस तोच विषय मांडणार?, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला.
दरम्यान, अजितदादा आणि माझ्यात स्पर्धा नाही. मी आणि अजितदादा म्हणजे काही राष्ट्रवादी नाही. लाखो कार्यकर्त्यांमुळे हा राष्ट्रवादी पक्ष आहे. आमची पक्षावर मक्तेदारी नाही. मी संसदेत समाधानी आहे. झपाटून काम करणे ही अजितदादाची सवय आहे. त्यामुळे छोट्या खिडकीतून पाहणे चुकीचे आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.