संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
राज्य शासनाच्या अन्यायकारक कर धोरणांविरुध्द जळगाव शहरात असंतोषाची लाट उसळली आहे. वॅट, नूतनीकरण फी व एक्साईज ड्युटीमध्ये झालेल्या वाढीमुळे हतबल झालेल्या बियर बार मालक, वाईन शॉप चालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोमवारी, १४ जुलै रोजी मूक मोर्चा काढत कर धोरणांविरुध्द विरोध व्यक्त केला. मोर्चानंतर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले. संघटनेतर्फे काढण्यात आलेला मोर्चा शांततेत पार पडला. त्यानंतरही आंदोलन अधिक तीव्र रूप धारण करणार असल्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशन, बियर बार मालक संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली झालेल्या मूक आंदोलनात शहरातील सर्व मद्यविक्री दुकानांसह बियर बार बंद ठेवले होते. अचानक १० टक्क्यांनी वाढलेला वॅट, १५ टक्क्यांनी वाढलेली नूतनीकरण फी तब्बल ६० टक्क्यांवर एक्साईज ड्युटी गेल्यामुळे व्यवसाय डबघाईस आला असल्याचा ठपका संघटनेने ठेवला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाने शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सहभागी आंदोलनकर्त्यांनी कोणताही गोंधळ न करता हातात निषेधाचे फलक घेत शासनाच्या धोरणाचा विरोध केला.
राज्यभर आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
निवेदनातून कर व शुल्कवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. सरकारच्या आकसपूर्ण निर्णयामुळे संपूर्ण उद्योग संकटात सापडला आहे.अनेक व्यावसायिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत, असेही निवेदनात नमूद केले आहे. संघटनेने प्रशासनाला याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. शासनाने जर लवकरात लवकर हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. मूक मोर्चाला व्यापाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांचा मोठा पाठिंबा लाभला होता.