उन्हाने केळी बागांची होरपळ; घड सटकण्याची समस्या
जळगाव (प्रतिनिधी )
जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून एप्रिल महिन्यातच ‘मे हिट’ सारखा तडाखा जाणवत आहे. वाढत्या उष्णतेचा केळी बागांनाही मोठा फटका बसत आहे. केळीच्या बागा होरपळल्या जात असून, केळीची पाने पिवळी पडत आहेत. केळीचे घड सटकण्याची समस्या तयार झाली आहे.
रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होते. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे केळीचे लागवड क्षेत्रही वाढले आहे. केळीच्या चांगल्या उत्पादनासाठी १२ ते ४० अंशांदरम्यानचे तापमान पोषक मानले जाते. शेतकऱ्यांनी उष्णतेपासून बागांच्या बचावासाठी हिरवी नेट किंवा नैसर्गिक वारा अवरोधक म्हणून शेवरी, संकरित गवताची लागवड केली आहे. काही अंशी बचाव होत आहे, तर काही ठिकाणी हिरवी नेट लावूनही केळीच्या बागा करपलेल्या दिसून आल्या आहेत. उष्णतेमुळे मुख्य रस्ते किंवा डांबरी रस्त्यावरील बागांमध्ये कोवळे घड काळे-पिवळे पडून खराब होत आहेत, ज्या बागांमध्ये अद्याप घड आलेले नाहीत, अशा ठिकाणी केळीची पाने खराब होत आहेत. यामुळे केळीचीही वाढ खुंटत आहे.
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी किंवा सिंचन आहे. मात्र, असे असतानाही लहान किंवा तीन महिन्यांच्या बागांमध्ये कोवळी पाने होरपळली जात आहेत. सकाळी ११ पासूनच ऊन तापू लागले आहे. सायंकाळी पाचपर्यंत उष्ण वारे असतात. रात्री ९ पर्यंत उष्ण वारे वाहतात. त्यामुळे केळीला फटका बसत आहे. केळीच्या एका झाडाला दिवसात २२ लीटर पाण्याची गरज असते. मात्र, महावितरणकडून पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने, शेतकरी पाणी असूनही, केळीला पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नाहीत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.