साईमत जळगाव प्रतीनिधी
माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. कारण माताने लग्नाआधीच शिवजींना पती म्हणून स्वीकारले होते. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या अद्भुत प्रेमाची आणि विवाहाची ही रंजक कथा आंतरराष्ट्रीय कथाकार महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी (बापू) यांनी कथन केली आहे. तसेच यावेळी शिव पार्वती विवाह सोहळा हर्षोल्हासात झाला. शहरातील नेरी नाका परिसरातील पांजरापोळ संस्थानच्या मैदानात सुरू असलेल्या भव्य संगीतमय शिव महापुराण कथेचा आज (दि. 2) तिसरा दिवस होता.
महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजींचे स्वागत अरुण भोळे यांनी सपत्नीक केले तर मनीष बाहेती यांनी सपत्नीक शिवमहापुराण ग्रंथाचे पूजन केले. तिसर्या दिवसाच्या कथाप्रारंभावेळी कथामंचावर अविनाश बोरोले, मनिष बाहेती, ललित पाटील, भूषण खडके, कुंदन काळे, विठोबा चौधरी, प्रशांत नाईक, भरत कोळी व पुष्कर बादले यांनी सपत्निक आरती केली. तर उपस्थित भक्तगणांपैकी सिमा वाणी, रंजना पांडे, नीता पाटील, सौरभ पाटील, रंजना सोनवणे व छाया माळी यांनाही व्यास गादीच्या आरतीचा मान देण्यात आला.
राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीश महाजन यांनी महाशिवपुराण कथेला उपस्थिती देत पूज्य बापूजींचा सत्कार केला. शहरात प्रथमच शिवमहापुराणच्या भव्य आयोजनासाठी मुख्य संयोजक आ.सुरेश दामु भोळे उर्फ राजूमामा व शिवमहापुराण समिती सदस्यांच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
शिवमहिमाच्या पुढील क्रमात बापूंनी शिव नैवेद्याचे महत्त्व सांगितले की, काही लोक म्हणतात की शिवाचा प्रसाद घेऊ नये. जो परमेश्वराचा भक्त असतो तो आतून आणि बाहेरून शुद्ध असतो. शिवाचा नैवेद्य घेतल्याने सर्व फळे प्राप्त होतात. शिव हा विश्वाचा निर्माता आहे. तो आमचा पालक आहे. त्यांचा प्रसाद स्वीकारणे अयोग्य कसे? घरामध्ये शिवाचा प्रसाद आल्यास तेथे पवित्रता येते. आपण सर्व शिवाचे आहोत. तसेच बेलपत्राचा महिमा सांगताना ते म्हणाले की, तिन्ही लोकांची तीर्थक्षेत्रे बेलपत्रात सामावलेली आहेत. ज्या घरात बेलपत्राचे झाड आहे तिथे शिवाचा वास असतो. गंगा जमुना सरस्वती हे बेलपत्राचे जलरूप आहे. जो भक्त बेलपत्राने शिवलिंगाची पूजा करतो त्याला पुण्य प्राप्त होते. रविपुष्य नक्षत्रात बेलपत्रासह शिवलिंगाला तुपाचा अभिषेक केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहते, असे स्पष्ट करून बापूजींनी इतरही अनेक विषयांवर प्रकाश टाकला.
शिवरात्री, शिव-पार्वतीचा विवाह. या दिवशी आपण सर्वजण या विवाह सोहळ्याला आपले सर्वस्व अर्पण करतो. तिन्ही लोक या लग्नाच्या तयारीत गुंततात. भगवान शिवाच्या श्रृंगारात, चंद्र स्वतः अवतरतो आणि कपाळावर प्रकट होतो. जटा-मुकुटाला शोभण्यासाठी गंगा अवतरते. सर्वत्र ओम नमः शिवायच्या गजर होतो. शिव शृंगारात भस्म ही लावले जाते. या परिवर्तनात, प्रत्यक्ष थेट कथेच्या दृश्यात शिव-पार्वती, ब्रह्मा, विष्णू, नारदमुनी, ऋषी वशिष्ठ इत्यादी वेषात सजलेली मुले व त्यांच्यासह भूत, पिशाच आणि राक्षसांच्या वेशात सोबत नाचत आणि गाताना लग्नमंडपात प्रवेश करतात. शिव आपल्या असंख्य रूपांनी उपस्थितांना चकित करतात. शिवाचे प्रत्यक्ष रूप पाहून मैनादेवी मातेच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. अशा रीतीने ‘बम लहरी’, ’बम बम भोले’ या मंगल गीतांच्या गजरात सृष्टी रचिताचा विवाह पार पडला. हे लग्न पाहणारे वराती म्हणून जळगावकरांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आमदार राजूमामाही स्वत:ला नाचवण्यापासून रोखू शकले नाहीत. सगळा पंडाल शिवमय होऊन नाचत होता. आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) व सौ.सीमाताई भोळे यांनी माता पार्वतीचे कन्यादान केले. अशा प्रकारे महाशिवपुराण कथेच्या तिसर्या पर्वात शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा झाला.
कथासमारोपाच्या वेळी कथामंचावर नितीन लढ्ढा, नंदू आडवाणी, स्वरुप लुंकड, अॅड. शुचिता हाडा, उमाकांत भादले, किशोर ढाके, अॅड.केतन ढाके, विलास महाजन, सौ.सुवर्णा महाजन, देवाचार्य महाराज, किशोर काळकर व सुजित चौधरी या सर्व मान्यवरांनी सपत्निक विधिवत आरती केली. यावेळी आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी उपस्थित राहून महामंडलेश्वरांचा आशीर्वाद घेतला. आरती नंतर शिवपार्वतीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची एकच रांग लागली. शेवटी भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले. पंच दिवसीय शिवमहापुराण महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रविवार, दि. 3 सप्टेंबर रोजी पूज्य बापूजी रुद्राक्षाचा महिमा सांगणार आहेत. कथा श्रवण करण्यासाठी भाविकांनी दुपारी 1.15 वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.