तीन जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांमध्ये ‘बहिणाबाई अभ्यासिकांना’ प्रारंभ

0
6

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांमध्ये ‘बहिणाबाई अभ्यासिकांना’ प्रारंभ होत आहे. यापैकी चार अभ्यासिका सुरू झाल्या आहेत तर येत्या आठवडाभरात उर्वरित सुरू होत आहेत. विद्यापीठाने अत्यंत अभिनव अशी योजना विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.

विद्यापीठाने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात बहिणाबाई अभ्यासिका सुरू करण्याची योजना मांडली होती. ग्रामपंचायत/नगरपंचायत हद्दीतील महाविद्यालयांमध्ये ही अभ्यासिका सुरू केली जावी, अशी विद्यापीठाने कल्पना मांडली. महाविद्यालयातील ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवांमध्ये संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परीक्षेच्या पूर्वतयारीकरीता आवश्‍यक असणाऱ्या बाबींचा विचार करून महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र वाचन कक्षाची निर्मिती करण्यात यावी आणि त्या कक्षाला ‘बहिणाबाई अभ्यासिका’ नाव देण्यात यावे, असे विद्यापीठ अधिकार मंडळाने ठरविले. त्यासाठी विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यासाठी ३० प्रस्ताव विद्यापीठाला प्राप्त झाले होते.

नियमावलीनुसार १४ महाविद्यालयांची निवड

नियमावलीनुसार १४ महाविद्यालयांची निवड करण्यात आली. त्यामध्ये त्रिमुर्ती इन्स्टिट्यूट फॉर्मसी पाळधी, जळगाव, श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर, गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी, कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद, प. रा. हायस्कुल सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव, सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय, ऐनपूर, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा-काकोडा, ता. मुक्ताईनगर, उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, दहिवेल, वाडीले महाविद्यालय थाळनेर, ता. शिरपूर, देवरे महाविद्यालय म्हसदी, ता. साक्री, गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नगाव, धुळे, साईबाबा भक्त मंडळ संचलित कला महाविद्यालय म्हसावद, ता. शहादा, रूरल फाउंडेशन संचलित वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा, लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालय विसरवाडी, ता. नवापूर यांचा समावेश आहे.

विद्यापीठाकडून अभ्यासिकेसाठी एका महाविद्यालयास दरमहा ५ हजार याप्रमाणे वर्षाकाठी ६० हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे. अभ्यासिकेत महाविद्यालयाकडे स्पर्धा परीक्षांची पुरेशी पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रे उपलब्ध असणे गरजेचे आहे. अभ्यासिकेची वेळ सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत असेल. विद्यार्थ्यांसाठी पुरेशे फर्निचर, आवश्‍यक पंखे, बेंच/टेबल खुर्ची, वीज पुरवठा, स्वच्छ पिण्याचे पाणी असणे गरजेचे आहे. महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत विनामुल्य प्रवेश राहील. महाविद्यालया बाहेरील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत प्रवेश हवा असल्यास नाममात्र शुल्क घेवून प्रवेश देण्याचा निर्णय महाविद्यालय आपल्या स्तरावर घेवू शकते. विद्यार्थ्यांचे उपस्थितीपत्रक त्या ठिकाणी ठेवले जाईल.

दरम्यान, श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर आणि गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी येथील अभ्यासिकांचे उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आदी उपस्थित होते. शेंदुर्णी येथील कार्यक्रमास प्राचार्य साळुंखे उपस्थित होते तर खडसे महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमास श्रीमती रोहिणी खडसे, प्राचार्य हेमंत महाजन, सिनेट सदस्य दिनेश चव्हाण उपस्थित होते. गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नगाव येथील अभ्यासिकेचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य एस. आर. पाटील, सिनेट सदस्य नितीन ठाकुर, प्राचार्य के. बी. पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here