साईमत बोदवड प्रतिनिधी
तालुक्यातील जवळपास सर्व रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. त्यात मुख्यता बोदवड -जामठी या मुख्य रस्त्याची अवस्था तर पाहण्याजोगी झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या खड्डामय रस्त्याने प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.\या बाबीकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करून रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
अतिशय महत्त्वाचा असणारा जामठी ते बोदवड रस्ताची जणु चाळणी झाली आहे.. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. तसेच लगतच्या दहा ते पंधरा गावातील नागरिकांची याच मार्गाने वाहतूक होत असते. अशा या सततच्या वर्दळीच्या रस्त्याची अवस्था सद्यस्थितीला पाहण्याजोगी झाली आहे. रस्त्यावर इतके मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे की, वाहन कसे चालवायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या कारणामुळे या मार्गावर रोज छोटे-मोठे अपघात घडत असतात. सदरचा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा निधी वापरून हा रस्ता बनवला होता, परंतु या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी खासदार, आमदार व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचीदेखील नेहमीच ये-जा होत असते. त्यांच्या या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात येऊ नये याला दूर्भाग्यच म्हणावे लागेल. अशा प्रकारचा दबका सूर येथून निघत आहे. आधीच या रस्तावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे, मोठी कसरत करून नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, रस्त्यावर तात्पुरते स्वरूपात डागडुजी करून नागरिकांना होणार्या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबीकडे आपले लक्ष केंद्रित करेल का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.