‘Indian Knowledge Tradition Olympiad’ : ‘भारतीय ज्ञान परंपरा ऑलिम्पियाड’ स्पर्धेत आयुष भामरे देशात द्वितीय

0
4

जयपुरला केंद्रीय संस्कृत विद्यापीठात भव्य सत्कार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे (इ. १२ वी विज्ञान) याने ‘भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाड २०२५’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत देशात द्वितीय क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्याच्या कामगिरीबद्दल त्याचा जयपुरला केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला देशभरातील नामवंत संस्कृत पंडित, विद्यापीठाचे कुलगुरू, विविध प्रांतातील प्राध्यापक, पालक आणि विजेते विद्यार्थी उपस्थित होते.

सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू यांनी स्वतःच्या हस्ते आयुषला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच हजाराचे रोख पारितोषिक प्रदान केले. यावेळी कुलगुरूंनी आयुषच्या परिश्रमाचे, भारतीय संस्कृत परंपरेवरील त्याच्या सखोल ज्ञानाचे आणि तरुण पिढीमध्ये संस्कृत विषयाबद्दल निर्माण होत असलेल्या रसाचे कौतुक केले. ‘भारतीय ज्ञान परंपरा ऑलिम्पियाड’ ही स्पर्धा नवी दिल्ली केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्रथमच राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली होती. स्पर्धेत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. वेद, उपनिषद, शास्त्र, भारतीय गणित, संस्कृत साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा यांवरील आव्हानात्मक प्रश्नपत्रिकेत आयुषने १०० पैकी १०० गुण मिळवून आपली असामान्य विद्वत्ता सिद्ध केली. राष्ट्रीय यशामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा आणि के.सी.ई. सोसायटी अभिमानाने उजळून निघाली आहे.

त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा. आर.बी. ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील, संस्कृताध्यापक प्रा. अर्जुनशास्त्री मेटे तसेच सर्व शिक्षक, सहाध्यायींनी कौतुक केले.आयुषच्या कामगिरीनंतर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. विद्यार्थ्यांनी त्याचे फुलांसह घोषणांनी स्वागत केले. त्याच्या सन्मानार्थ विशेष समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here