Jalgaon To Pal : जळगाव ते पाल व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती रॅलीला प्रारंभ

0
53

व्याघ्र संवर्धन चळवळीची घेतली पताका

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जळगाव वन्यजीव संरक्षण संस्था आणि यावल वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस सोमवारी, २८ जुलै रोजी जळगाव येथून उत्साहात प्रारंभ झाला. रॅलीला आ.राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या दोन दिवसांच्या रॅलीत राज्यभरातून आलेले १०० व्याघ्रदूत आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे २५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. रॅलीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

यावल वनविभागाकडून त्यांना जंगल सफारीचा अनुभव देण्यात येणार आहे. नशिराबाद, भुसावळ, सावदा, फैजपूरमार्गे पाल याठिकाणी मंगळवारी, २९ जुलै रोजी जनजागृती कार्यक्रम होईल.रॅली दरम्यान “वाघ वाचवा, जंगल वाचवा” असा संदेश देत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. जंगलाच्या प्रतिकृतीसारख्या सजविलेल्या सफारी वाहनावर उभे असलेले दोन मानवी वाघ विशेष आकर्षण ठरले. नागरिकांनी मानवी वाघांसोबत सेल्फी काढून रॅलीचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मुकेश सोनार, सतीश कांबळे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

पालला आज होणार विविध कार्यकम्र

पाल येथे २९ जुलै रोजी विवेकानंद प्रतिष्ठानच्या शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांना जंगल सफारी टी-शर्ट वाटप, दुर्गम भागातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसह वनमजुरांना चटई वाटप, वृक्षारोपण व बिजारोपण यासारखे कार्यक्रम उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती सचिव योगेश गालफाडे यांनी दिली.उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यावल वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच वन्यजीव संस्थेचे रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, मुकेश सोनार यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, ट्रेकर्स ग्रुप आणि वन्यजीवप्रेमी कार्यरत आहेत. सूत्रसंचालन बाळकृष्ण देवरे तर यावल वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here