कैद्यांना मूलभूत मानवी हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
महाराष्ट्र कारागृह विभागाच्या “सुधारणा व पुनर्वसन” या धोरणात्मक ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त जळगाव जिल्हा कारागृहात मानवी हक्क जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची संकल्पना सचिव, मानवी हक्क आयोग, मुंबई प्रदीपकुमार डांगे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे सुहास बारके आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात आली. कार्यक्रमात कारागृहातील न्यायाधीन बंद्यांना मानवी हक्क, विधिक मदत, पुनर्वसनाच्या संधी आणि मूलभूत संवैधानिक अधिकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कारागृहातील पुनर्वसन उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी, तणाव व्यवस्थापन, समाजमुखी पुनर्वसनाचे महत्व आदी विषयांवर माहितीही देण्यात आली. कार्यक्रमात कारागृहातील कैद्यांना त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पवन एच. बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक अरुण आव्हाड, जिल्हा कारागृह अधीक्षक प्रकाश परदेशी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण, तुरुंगाधिकारी आर. ओ. देवरे, दिलीपसिंग गिरासे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
