
‘स्वच्छतेचा संदेश’ जिवंत अभिनयातून नागरिकांपर्यंत पोहोचवला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्यावतीने समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बसस्टँड, रेल्वे स्टेशन, काव्यरत्नावली चौक, एम.जे.कॉलेज परिसरात प्रभावी पथनाट्याचे आयोजन केले होते. शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण आणि जिवंत अभिनयातून ‘स्वच्छतेचा संदेश’ नागरिकांपर्यंत पोहोचवला.
पथनाट्यातून स्वच्छ परिसर राखण्याचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा कमी वापर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थिनींच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे दिलेला संदेश थेट हृदयाला भिडणारा ठरला आणि उपस्थित नागरिकांनी त्याचे कौतुकाने स्वागत केले.
उपक्रमाचे संयोजन आणि मार्गदर्शन मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, प्रतिभा लोहार, रोहिणी पाटील, दिगंबर पाटील, रफिक नजीर तडवी, वेदप्रकाश गडदे, नूतन वराडे, चेतन सोनार, विवेक मोरे यांनी केले. त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक परिणामकारक आणि यशस्वी झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. विद्यार्थिनींचा आत्मविश्वास, अभिनय कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी पाहून उपस्थित नागरिकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्यासाठी पथनाट्य उपयुक्त ठरले आहे. पुढील काळातही शाळेच्यावतीने अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाणार असल्याची माहिती शालेय प्रशासनाने दिली.


