
जागृती अभियानाला प्रारंभ, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भारत सरकार आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्सविषयी जागृती अभियानाला प्रारंभ झाला आहे. त्याअनुषंगाने जैन इरिगेशन सिस्टम्स लि. येथे प्लास्टिक पार्कमधील सहकाऱ्यांसाठी आयकर विषय जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला. सरकार आणि करदाते यांच्यामधील अंतर कमी व्हावे, रिटर्न भरण्याची सुलभता आदी विषयांवर तसेच आयकर भरताना सहकाऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृष्णमूर्ती अय्यर, मनीष भगत, दीपक श्रीवास्तव, कुणाल वाघ, रविंदर कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयकरबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे स्वागत जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष-कार्मिक सी. एस. नाईक यांनी केले. त्यांच्या सोबत जैन इरिगेशनच्या आयकर विभागातील लक्ष्मीकांत लाहोटी, जितेंद्र कापसे, एक्साईज ॲण्ड कस्टम विभागाचे डी. आय. देसर्डा, अनिल मुंगड उपस्थित होते.
इन्कम टॅक्स रिटर्न कसे भरावे, डिडक्शन कशी करावी, त्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक असतात. त्याचप्रमाणे बोगस क्लेम करण्याऱ्यांची ओळख कशी करावी, भविष्याच्या दृष्टीने बोगस क्लेम किती नुकसानकारक असू शकतो. शासनाच्या अधिकृत इन्कम टॅक्स वेबसाईटवर आपली स्वतःची माहिती कशी भरावी, ती स्वत: वेळोवेळी तपासून त्यात काही बदल करता येतात का? यावर सहकाऱ्यांना अमूल्य अशी माहिती दिली.
सध्या सायबर क्राईम खूप वाढत आहे. आयकरच्या नावाने फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. अनेक जण त्याला बळी पडत आहे, असे फेक कॉल किंवा संपर्क आल्यास थेट इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी जैन इरिगेशनमधील शंभरच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आयकर विभागाच्या मार्गदर्शनाचा कंपनीतील सहकाऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असे म्हणत लक्ष्मीकांत लाहोटी यांनी आभार मानले.


