
विद्यापीठ, जिल्हास्तर अशा दोन टप्प्यात स्पर्धा ; बक्षिस रक्कम वाढ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित आविष्कार-२०२५ स्पर्धेकरीता प्रवेशिका नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आविष्कार-२०२५ स्पर्धेचे आयोजन दोन टप्प्यात करणार येणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठ प्रशाळेंसाठी ४ डिसेंबर आणि ८ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय स्पर्धा जळगाव जिल्ह्याकरीता पी.आर. हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव येथे, धुळे जिल्ह्यासाठी झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथे तर नंदुरबार जिल्ह्यासाठी विद्यापीठ संचलित कला विज्ञान महाविद्यालय, मोलगी व आदिवासी अकादमी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी अकादमी, नंदुरबार येथे आविष्कार -२०२५ जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठस्तरीय स्पर्धा ३० व ३१ डिसेंबर रोजी विद्यापीठात आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २०० रुपये भरून नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी करण्याची मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी पदवी, पदव्युत्तर व पोस्ट पदव्युत्तर असे तीन स्तर असणार आहे. प्रत्येक स्तरावर मानवविज्ञान, भाषा व ललितकला यांचा एक गट, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी यांचा दुसरा गट तर विज्ञान विषयांसाठी तिसरा गट, कृषी व पशुपालन या विषयांसाठी चौथा गट, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयांचा पाचवा गट आणि औषधीनिर्माण व वैद्यकशास्त्र करीता सहावा गट असणार आहे. स्पर्धेत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिस रक्कमेत या वर्षापासून वाढ केली आहे. रोख स्वरुपात पहिले पारितोषिक दोन हजार रुपये, दुसरे पारितोषिक दीड हजार रुपये, तिसरे पारितोषिक एक हजार रुपये तर पोस्ट पदव्युत्तरांसाठी पहिले पारितोषिक दोन हजार रुपये व दुसरे पारितोषिक दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत विजेत्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी अधिछात्रवृत्ती (प्रथम क्र. ३५ हजार, द्वितीय ३० हजार तर तृतीय २५ हजार रुपये) तर पोस्ट पदव्युत्तर विजेत्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी अधिछात्रवृत्ती (प्रथम क्र. एक लाख २० हजार व द्वितीय क्र. एक लाख रुपये) अशी दिली जाणार आहे. तसेच राज्यस्तरीय सहभागी विद्यार्थ्यांना १० गुणांचे किंवा त्या समकक्ष क्रेडीट देण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील सहभागासाठी प्रशाळेतील गटासाठी प्रा.विशाल पराते व डॉ. संदीप भामरे यांच्याशी तर जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयीन स्तरासाठी प्राचार्य उदय जगताप, डॉ. दीपक बोंडे, डॉ. स्वप्नील खरे, धुळे जिल्ह्यासाठी प्राचार्य वर्षा पाटील, डॉ. रवींद्र महाले, डॉ. समाधान पाटील तर नंदुरबार जिल्ह्यासाठी प्रा.किशोर पवार, डॉ. स्मिता देशमुख, डॉ. योगेश राणे यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रमुख कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी तर उपप्रमुख प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे व कुलसचिव डॉ.विनोद पाटील असून उपसमन्वयक डॉ. अमरदीप पाटील, समन्वयक डॉ. नवीन दंदी आहेत, असे स्पर्धेचे सचिव डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, विद्यार्थी विकास संचालक यांनी सांगितले.


