नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड रेकॉर्ड रचत वर्ल्ड कपमध्ये एक नवा इतिहास लिहिला आहे. ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात सर्वात जलद शतक झळकावण्याचा मान आपल्या नावावर केला. डेव्हिड वॉर्नरच्या शतकाने ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला चांगलीच उभारी दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात ३९९ धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ ९० धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने ३०९ धावांनी मोठा विजय साकारला. वर्ल्ड कपच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे.
ऑस्ट्रेलियाची नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात चांगली सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मिचेल मार्श चौथ्या षटकात बाद झाला. पण त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकी भागिदारी केली. स्मिथने ६८ चेंडूत ७१ धावा केल्या. त्यानंतर मार्नश लाबुशेनने वॉर्नरसोबत संघाला २५०च्या घरात पोहोचवले. लाबुशेनने ४७ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. दरम्यान वॉर्नरने वर्ल्डपकमधील आणखी एक शतक पूर्ण केले. त्याने ९३ चेंडूत ३ षटकार आणि ११ चौकारांसह १०४ धावा केल्या. वॉर्नर बाद झाल्यानंतर नेदरलँड्सच्या गोलंदाजांना थोडा दिलासा मिळेल असे वाटले होते. पण मॅक्सवेल पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर तुटुन पडला. त्याने फक्त ४४ चेंडूत ८ षटकार आणि ९ चौकारांसह १०६ धावा केल्या. वॉर्नर आणि मॅक्सवेल यांच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ८ बाद ३९९ अशी विक्रमी धावसंख्या उभी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजयाचा पाया रचला होता. त्यावर गोलंदाजांनी कळस चढवला. कारण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनीही तिखट मारा केला आणि नेदरलँड्सला फक्त ९० धावांत रोखण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झाम्पाने फक्त आठ धावांत चार विकेट्स मिळवले आणि संघाला घवघवीत यश मिळवून दिले.
मॅक्सवेलने फक्त ४० चेंडूत
झळकावले जागतिक विक्रमी शतक
दुबळ्या नेदरलंँड्सविरुद्धच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने हात धुवून घेतले.टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने फक्त ४० चेंडूत वादळी शतक पूर्ण केले.वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक आहे.याआधी हा विक्रम याच वर्ल्डकपमध्ये एडन मार्कराम याने याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध केला होता, तेव्हा मार्करामने ४९ चेंडू शतक पूर्ण केले होते.