साईमत, पारोळा : प्रतिनिधी
एकीकडे गोंडगावच्या भयंकर घटनेमुळे समाजमन सुन्न झालेले असतांनाच त्याच प्रकारची घटना पारोळा तालुक्यात घडली आहे. अल्पवयीन मुलीने अत्याचाराला विरोध करताच तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी रोजी सायंकाळी घडली. पीडित मुलगी जखमी झाली असून तिच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. पारोळा येथे नागरिकांनी रास्ता रोको करून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्यांची समजूत काढल्याने आंदोलक शांत झाले.
सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच पारोळा तालुक्यातील एका गावातही असल्या प्रकाराची पुनर्रावृत्ती टळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिक संतापले आहेत.
पीडित मुलीच्या भावाने दिली फिर्याद
पारोळा तालुक्यातील एका गावातील रहिवासी अल्पवयीन मुलगी ही शौचासाठी गेली असतांना अशोक उर्फ बारक्या मंगा भील (मोरे) याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी तिने प्रतिकार केल्यामुळे त्याने डोक्यात दगड मारून तसेच दोरीने गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अशोक उर्फ बारक्या मंगा भील (मोरे) याच्या विरोधात भादंवि कलम ३७६ (३), ३०७, ३५४, ३२३ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ८, १०, १२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
……………………………………..