दक्षिणा न दिल्याच्या कारणावरून संताप; ढाबा मालकासह कामगारांविरोधात गुन्हा दाखल
साईमत / पालघर
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाडा-खडकोना गावाजवळ एका ढाब्यावर टेम्पो चालकावर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चालकाला बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दानिश खान (वय ३०) या टेम्पो चालकावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ढाबा मालकासह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास दानिश खान हा त्याचा सहाय्यक सोनु पाल याच्यासह गुजरातकडे जात असताना वाडा-खडकोना परिसरातील जयअंबे ढाब्यावर विश्रांतीसाठी थांबला होता. कोल्ड्रिंक घेतल्यानंतर टेम्पोकडे परतल्यावर चावी सापडत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. चावीच्या शोधात तो पुन्हा ढाब्यावर गेला असता मालकाने चावी दिली; मात्र त्याबदल्यात मंदिरात वीस रुपये दक्षिणा देण्याची मागणी केली.
सुट्टे पैसे नसल्याने दानिशने नकार दिल्यावर ढाबा मालक संतापला. त्यानंतर मालकासह आठ ते दहा कामगारांनी मिळून दानिशवर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. इतकेच नव्हे, तर त्याला बाजूच्या खोलीत नेऊन टी-शर्ट काढत लाकडी काठी व चामडी पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली.
हल्लेखोरांनी त्यानंतर धमकावत दानिशच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. या दरम्यान मदतीसाठी धावून आलेल्या सहाय्यक सोनु पाललाही मारहाण करण्यात आली.
घटनेची माहिती आपत्कालीन क्रमांकावर दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दानिशची सुटका केली. गंभीर अवस्थेतील जखमी चालकाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी पीडिताच्या फिर्यादीवरून ढाबा मालक आणि संबंधित कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
