आरोपीच्या सुटकेसाठी पथकावर हल्ला करीत पोलिसालाच डांबले
जळगाव ( प्रतिनिधी ) —
गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधात चोपडा ग्रामीण पोलीस गेले असता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काहीजणांकडून पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्याची घटना चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत उमर्टी इथे घडली. हल्ल्यानंतर एका पोलिसाला डांबून ठेवण्यात आले, मारहाणीत सहायक पोलिस निरीक्षकासह दोन जण जखमी झाले आहेत.
चार तासांच्या थरारानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला सुखरुप परत आणण्यात पोलिसांना यश आले या घटनेने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांचेच अपहरण होऊन डांबून ठेवण्याचा प्रकार होत असेल तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर उमर्टी गाव असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे सीमेपलीकडील मध्यप्रदेशात आहे. या गावात अवैध शस्त्र बनविण्यात येतात नदीच्या दोन्ही बाजूला गाव आल्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेश असे दोन्ही राज्याच्या सीमेवर वसलेल्या या गावांमध्ये गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस गेले होते.गावातील काहीजणांनी एका पोलीसाला ताब्यात घेऊन सीमेपलीकडे असलेल्या मध्यप्रदेशातील उमर्टी गावात नेल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकाऱ्यांचा ताफा उमर्टीकडे रवाना झाला.
या घटनेसंदर्भात मध्य प्रदेश पोलीस व प्रशासनाशी संपर्क जिल्हाधिकारी यांनीही साधला होता.चार तासांच्या थरारानंतर अपहरण करण्यात आलेल्या शशिकांत पारधी या पोलिसाची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. जळगावसह मध्यप्रदेशातील पोलिसांनी या पोलिस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी मोठी कुमक रवाना केली होती. पोलिसांची मोठी कारवाई होण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी बांधून ठेवण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची सुटका केली.चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस शिपाई किरण पारधी जखमी झाले. जखमी नितनवरे व पारधी यांना रात्री चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली.