महामार्गाच्या ८० किलोमीटर अंतरावर केवळ एकच झाड डौलाने उभे

0
17

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

महामार्ग चौपदरीकरणाच्या नावाखाली प्रशासनाने जुन्या महामार्गालगत बिट्रीश कालीन असलेल्या डेरेदार हिरव्या कडुनिंबाच्या झाडांच्या कत्तलीना हिरवी झेंडी दाखविली. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तरसोद ते चिखली मार्गावर रात्रीचा-दिवस करून अडसर नसलेल्या वृक्षांवरही कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना नामशेष केले. त्यामुळे नव्याने निर्माण झालेला हा महामार्ग डेरेदार वृक्षाविना बोडखा झाला असला तरी वरणगाव ते भुसावळ मार्गावरील जाडगाव फाट्याजवळ असलेल्या नागेबाबा देवस्थानामुळे ‘जीवदान’ मिळालेला एकमेव कडुनिंबाचा डेरेदार वृक्ष दुभाजकामध्ये डौलात उभा असल्याने वाहनधारकांना दिलासादायक ठरत आहे.

राज्य व केंद्र शासनाच्या महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून धुळे ते अमरावतीपर्यंत जुन्या महामार्गाचे टप्प्याटप्याने चौपदरीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चौपदरीकरणाचाही समावेश आहे. जिल्ह्यातील तरसोद ते विदर्भाच्या सीमेवर असलेल्या चिखली गाव व त्यानंतर पुढे चौपदरीकरण केले आहे. मात्र, तत्पूर्वी जुन्या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या व चौपदरीकरणासाठी अडसर ठरणाऱ्या ब्रिटीशकालीन घनदाट डेरेदार कडुनिंबाच्या वृक्षाच्या कत्तलीसाठी दहा – बारा वर्षापूर्वी प्रशासनाने हिरवी झेंडी दाखविल्याने संबंधित ठेकेदाराने आलेल्या संधीचा फायदा घेत रात्रंदिवस एक करून अवघ्या काही दिवसातच तरसोद ते चिखलीपर्यंतचा महामार्ग बोडखा करून टाकला. प्रत्यक्षात मात्र, महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू झाल्याने वृक्ष तोडीची कशासाठी व कोणासाठी असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले. मात्र, भुसावळ ते वरणगाव मार्गावरील जाडगाव फाट्याजवळ एका कडुनिंबाच्या झाडाखाली अनेक वर्षापासून असलेल्या नागेबाबा देवस्थानच्या या वृक्षाच्या कत्तलीला फुलगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी व इतर भाविकांनी विरोध केल्याने या वृक्षाला ‘जीवदान’ मिळाले आहे. आज रोजी या चौपदरीकरण महामार्गाच्या दुभाजकामध्ये नागेबाबाचा हा वृक्ष डौलाने उभा आहे. परिसरातील अनेक वाहनधारक कडुनिंबाच्या झाडाखाली असलेल्या नागेबाबाला वंदन केल्याशिवाय पुढे जात नाही.

कंत्राटदाराने बिघडविला पर्यावरणाचा समतोल

महामार्ग चौपदरीकरणाच्या आधीच कंत्राटदार संबंधित विभागाने नियमांची पायमल्ली करीत जुन्या महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या डेरेदार वृक्षांची कत्तल केली. तसेच त्याठिकाणी काम सुरू होण्यापूर्वी नियोजनानुसार मानवी व इतर प्राणी वर्गाला आवश्‍यक असलेल्या वृक्षांची अद्यापही लागवड केली नसल्याने त्याचा परिणाम मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारक व परिसरातील नागरिकांच्या जीवनावर होत आहे. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या कंत्राटदारानेच निसर्गाचा समतोल बिघडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हातभार लावला आहे. या प्रकरणाकडे मात्र, वरिष्ठ अधिकारी व पर्यावरण प्रेमी नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

अनावश्‍यक वृक्षांची नावालाच केली लागवड

संबंधित कंत्राटदाराने शासनाच्या नियमांची पायमल्ली तसेच नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत कडुनिंब, चिंच, वड, पिंपळ अशा वृक्षरोपांची लागवड न करता अवघे काही वर्ष आयुष्य असलेल्या तसेच अनावश्‍यक वृक्षरोपांची काही भागातच लागवड केली आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात असल्याने प्रशासन त्याची दखल घेईल का? अशी मागणी होत आहे.

कंत्राटदाराची चौकशी करा

महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराने नियमांची पायमल्ली केली आहे. काम सुरू करण्यापूर्वी कृती आराखड्यानुसार आवश्‍यक वृक्ष रोपांची लागवड करणे आवश्‍यक होते मात्र कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने त्यांची चौकशी करून कारवाई करणे अपेक्षित असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here