संशयित पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल
साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी :
येथील आठवडे बाजाराच्या ओट्यांवर धार्मिक सणानिमित्त १८ सप्टेंबर रोजी रात्री आयोजित सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमात स्थानिक दोन तरुणांमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद उफाळला होता. याप्रकरणी आरोपी शेख हैदरला रात्री पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पो.स्टे.ला गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपीला न्यायालयात हजर केल्याचे सांगण्यात आले.
सविस्तर असे की, आरोपी शेख हैदर शेख मंजूर (वय ३७, रा. मोठा आखाडा, सावदा) याने फिर्यादी सैय्यद मोईन सैय्यद सलीम या तरुणाला बघून आरोपीने हातात लोखंडी हातोडा (घन) घेऊन आला होता. फिर्यादीला मारणार या भीतीपोटी फिर्यादी तेथून पळून जात असताना शेख हैदरने फिर्यादीच्या डोक्याकडील मागील बाजुस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर फिर्यादी रक्तबंबाळ स्थितीत दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात माहिती मिळताच सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील, पोलीस कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली. पुढील तपास सपोनि विशाल पाटील, पीएसआय राहुल सानप, अमोल गर्जे करीत आहे.
घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही
घडलेल्या घटनेची माहिती घेतल्यावरुन जुन्या वादावरून हा गंभीर प्रकार घडलेला आहे. या प्रकरणासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टींची नागरिकांमध्ये चर्चा होत असल्याचे समजते. शहरात अशा घडलेल्या घटनेमुळे समाज बांधवांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, घटनेचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही.